NEET Paper Leak : नीट पेपरफुटी : मनिषा हवालदारकडून पैशांच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिकेची गोपनीय माहिती

विशेष प्रतिनिधी

पुणे : NEET Paper Leak देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठा खुलासा झाला असून, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) अधिकृत अनुवादक मनीषा हवालदार हिला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिकेची गोपनीय माहिती पैशांच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. या बदल्यात लाखो रुपयांची रोख रक्कम स्वीकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.NEET Paper Leak

मनीषा हवालदार या भौतिकशास्त्र विषयाच्या अधिकृत अनुवादक म्हणून कार्यरत होत्या. अधिकृत जबाबदारीमुळे त्यांना प्रश्नपत्रिकेचा मजकूर परीक्षा होण्यापूर्वीच उपलब्ध होत होता. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, त्यांनी या अधिकाराचा गैरवापर करत मनीषा मांढरे हिच्याशी संगनमत केले आणि निवडक विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवण्याचा कट रचला.
सीबीआयच्या तपासात असेही उघड झाले आहे की, संशय टाळण्यासाठी आरोपींनी अत्यंत चलाखीने व्यवहार केले. मनीषा हवालदार यांनी स्वतःचा मोबाईल वापरण्याऐवजी पतीच्या फोनचा वापर करून प्रश्नमालिका पुढे पाठवल्या. तसेच व्हॉट्सॲपवरील सर्व संभाषण डिलीट करण्यात आले. तपास यंत्रणांच्या हाती कोणताही पुरावा लागू नये यासाठी भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या हाताने लिहिलेल्या नोट्स जाळून टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे.NEET Paper Leak



सीबीआय अधिकाऱ्यांच्या मते, पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींकडून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करण्यात आले. डिजिटल ट्रेल मिटवणे, वेगवेगळे मोबाईल वापरणे आणि थेट आर्थिक व्यवहार टाळणे, अशा अनेक पद्धती वापरून तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.

या प्रकरणातील दुसरी प्रमुख आरोपी मनीषा मांढरे हिला न्यायालयाने १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तपास अधिकाऱ्यांना तिच्या चौकशीत मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण मांढरेची स्मरणशक्ती अत्यंत तीक्ष्ण असल्याने तिला प्रश्नपत्रिका पूर्णपणे तोंडपाठ होती. त्यामुळे तिने कोणतेही लेखी दस्तऐवज किंवा डिजिटल पुरावे मागे ठेवले नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या रॅकेटमधील आणखी एक आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मांढरेचे नाव घेतल्यानंतर संपूर्ण साखळी उघड होऊ लागली. त्यानंतर सीबीआयने तपासाचा वेग वाढवत पुणे, दिल्ली आणि इतर राज्यांतील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.

मनीषा हवालदार यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आली आहे. त्यांना २५ मे रोजी दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. सीबीआय आता या रॅकेटमागील आर्थिक व्यवहार, कोचिंग नेटवर्क, मध्यस्थ आणि इतर मोठ्या नावांचा शोध घेत आहे.

पुण्यातील दोन महिलांच्या अटकेमुळे नीट पेपरफुटीचे जाळे केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित नसून राष्ट्रीय स्तरावर पसरल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच या प्रकरणामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

NEET Paper Leak: Manisha Hawaldar leaked confidential question paper details to students for money

महत्वाच्या बातम्या