Bandu Andekar : बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा, २२ लाखांची रोकड व शस्त्र जप्त

विशेष प्रतिनिधी

पुणे : Bandu Andekar गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी करत २२ लाख रुपयांची रोकड आणि एक बंदूक जप्त केली आहे. आंदेकर कुटुंब पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.Bandu Andekar

राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी बृहन्मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यभर आचारसंहिता लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आचारसंहिता काळात बंडू आंदेकरच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.Bandu Andekar



या माहितीनंतर पुणे पोलिसांनी काल सायंकाळी आंदेकरच्या निवासस्थानी छापेमारी केली. या छाप्यात २२ लाख रुपयांची रोकड आणि एक बंदूक जप्त करण्यात आली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ही रोकड निवडणूक खर्चासाठी जमवण्यात आल्याचा संशय आहे. आचारसंहिता काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आल्याने निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

पुण्याच्या राजकीय पटलावर आंदेकर कुटुंबाचे अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. कुटुंबातील काही सदस्य तुरुंगात असतानाही बंडू आंदेकर स्वतः पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीत सक्रिय होता. निवडणुकीसाठी लागणारी आर्थिक जमवा-जमव आणि इतर स्रोत उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या छाप्यामुळे आंदेकर कुटुंबाच्या राजकीय तयारीला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक तोंडावर असताना झालेल्या या कारवाईमुळे कुटुंबाचा आर्थिक कणा मोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पोलिसांनी जप्त केलेली रोकड आणि शस्त्र याबाबत पुढील चौकशी सुरू असून, आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

आंदेकर कुटुंबाचे पुण्याच्या राजकारणात मोठे वजन राहिले आहे. बंडू आंदेकरच्या कुटुंबातील वत्सला आंदेकर या काँग्रेस पक्षाकडून पुणे महानगरपालिकेच्या महापौर राहिल्या आहेत. १९९८-९९ या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे महापौरपद भूषवले. तत्कालीन पुण्याचे कारभारी आणि काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांच्यावर दबाव टाकून त्यांनी महापौरपद मिळवले, अशी चर्चा त्या काळात मोठ्या प्रमाणावर झाली होती.

वत्सला आंदेकर यांचे पुतणे वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते. पुणे महापालिकेच्या राजकारणात ते एक प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जात होते. मात्र, सप्टेंबर २०२४ मध्ये वनराज आंदेकर यांची हत्या झाली, ज्यामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येनंतर आंदेकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही महापालिकेच्या राजकारणात सक्रिय राहिले आहेत. नगरसेवकपदापासून महापौरपदापर्यंत आंदेकर कुटुंबाने आपली पकड कायम ठेवली आहे. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीतही आंदेकर कुटुंब पुन्हा ताकदीने मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती.

Police raid Bandu Andekar’s house, seize cash worth Rs 22 lakh and weapons

महत्वाच्या बातम्या