विशेष प्रतिनिधी
पुणे : Dhangekar–Pawar पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सोमवारी भेट घेतल्याने शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील जिजाई या अजित पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले असले, तरी जागावाटपाच्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहिले जात आहे.Dhangekar–Pawar
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होण्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून दिले जात होते. मात्र शिवसेनेने भाजपकडे दिलेल्या जागावाटपाच्या प्रस्तावावर समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. त्यातूनच धंगेकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. धंगेकर आणि पवार यांच्यात तीन ते चार मिनिटांची चर्चा झाली, मात्र या चर्चेतून कोणताही ठोस निष्कर्ष निघाल्याचे संकेत मिळाले नाहीत.Dhangekar–Pawar
भाजपकडून शिवसेनेला अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे पर्यायी राजकीय शक्यतांचा शोध घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हा प्रयत्नही फारसा पुढे गेला नसल्याचे समोर आले आहे.
सध्याच्या स्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या भूमिकांमुळे शिवसेना कोंडीत सापडली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप आपल्या भूमिकेवर ठाम असून, पुण्यात शिवसेनेसाठी पंधरा अधिक एक अशा एकूण १६ जागा देण्यावरच आग्रह धरत असल्याचे सांगितले जाते. त्यापेक्षा अधिक जागा देण्यास भाजप तयार नसल्याचे स्पष्ट झाले असून, गरज पडल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारीही भाजपकडून दर्शवली जात असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे शिवसेनेतही जागावाटपाबाबत एकमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पक्षातील गोंधळाची स्थिती अधिक ठळक होत आहे. अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले असले, तरी पुण्यातील एकाही शिवसेना उमेदवाराला अद्याप एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
या भेटीबाबत धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी कोणताही ‘ग्रीन सिग्नल’ दिला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही भेट खरोखरच सदिच्छा भेट होती की कोणत्या तरी प्रस्तावाच्या अनुषंगाने झाली होती, याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत. आगामी काळात शिवसेनेला कोणत्या पक्षाकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना किती व कशा प्रकारे जागांवर दावा करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dhangekar–Pawar Meet Sparks Buzz Over Possible Shiv Sena–NCP Tie-Up
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत