CM Devendra Fadnavis : शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

विशेष प्रतिनिधी

आग्रा : CM Devendra Fadnavis छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी आहे. आग्रा येथे ज्या ठिकाणी महाराजांना कैद केले होते तेथे पुढील वर्षी स्मारकाचे काम सुरु झालेले असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.CM Devendra Fadnavis

शिवजयंतीनिमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ला येथे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शिवजन्मोत्सव भारतवर्ष का’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील, उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार प्रशांत बंब, मीना बाजार ट्रस्टचे अनिल गुप्ता, कार्यक्रमाचे आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या अनोख्या महोत्सवाच्या आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे.CM Devendra Fadnavis



आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परंपरा ही वैशिष्ट्यपूर्ण असून यापुढे ती निष्ठेने जपली जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आग्रा येथील शिवाजी महाराजांना कैद केलेल्या जागेवर स्मारक उभारण्याचा संकल्प गेल्या जयंतीदिनी आम्ही सोडला होता. हे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठित केली. उत्तर प्रदेश सरकारनेही जमीन अधिग्रहणासंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घेत सहकार्य केले असून या स्मारकाच्या निर्मितीला लवकरच गती मिळेल. तसेच पुढच्या वर्षापासून या जागेवरही जयंती साजरी केली जाईल. शिवरायांचा इतिहास महाराष्ट्रात शिकवला जातो तो आता देशभरात शिकवला जावा या जनभावनेच्या आदर करून नव्या सीबीएसईच्या पुस्तकात आता शिवरायांच्या इतिहासाला २० पाने दिली आहेत. यापूर्वी केवळ एका परिच्छेदात हा इतिहास सांगण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हा इतिहास आता सर्वत्र पोहोचत असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

छत्रपती शिवरायांच्या ४०० व्या जन्मशताब्दी वर्षी म्हणजे २०३० मध्ये आग्रा येथील याच लाल किल्ल्यात पंतप्रधान मोदींसह आम्ही हा उत्सव साजरा करु, असे आत्मविश्वासाने सांगून मुख्यमंत्री म्हणाले, अनेक योद्धे देशात झाले पण शिवराय अद्वितीय होते. बलाढ्य मुघलांशी अनेकांनी समझोता केला मात्र, अशा काळातही शिवरायांना रयतेचे राज्य स्थापन करण्याची प्रेरणा माँसाहेब जिजाऊंनी दिली. त्यानंतर शिवरायांनी प्रतिज्ञा घेऊन यासाठी स्वराज्यनिर्मितीचा ध्यास घेतला. अठरापगड जातींना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य, स्वभाषा आणि स्वाभिमानाच्या लढाईची शिकवण दिली. महाराजांनी रूढ केलेला गनिमी कावा जगभरात स्वीकारला गेला. महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले नाही तर एक विचार दिला. त्यामुळे मुघलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हिंदवी स्वराज्य नष्ट झाले नाही. उलट हे साम्राज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाची कबरच इथे खोदली गेली.
पुढील काळात तर मराठी साम्राज्य कटकपासून अटकपर्यंत पोहोचले. मुघलांनंतर थेट इंग्रज राज्य स्थापन झालेले नाही. त्यामधल्या काळात मराठ्यांचा उज्वल इतिहास निर्माण झाला आहे. मात्र, तो दुर्लक्षित केला गेला होता. या गौरवशाली इतिहासाला आम्ही पुन्हा उजाळा देत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती आणि न्यायदानाचा गौरव करत महाराजांनी जगाला दिलेली गनिमी काव्याची युद्धपद्धती आजही तितकीच प्रभावी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, महाराजांनी सुरत लुटली हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे; उलट तिथल्या व्यापाऱ्यांनी मुघल सत्तेच्या जाचातून मुक्त होण्यासाठी महाराजांना पाचारण केले होते, याचे दाखले आहेत. ज्यावेळेस सुरतमध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले त्यावेळेस लाखोंचा जनसागर उपस्थित होता. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने गुजरातमधील नवसारी, सोनगड, व्यारा अशा अनेक ठिकाणी महाराजांचे पुतळे उभारण्यात आले. परस्त्रीला मातेचा दर्जा देऊन त्यांनी स्त्री सन्मानाचा सर्वोच्च आदर्श जगासमोर ठेवला. न्यायदानाच्या बाबतीत महाराज अत्यंत कठोर आणि निष्पक्ष होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमध्ये ‘जाणता राजा’ महानाटकाद्वारे हे शिवविचार घराघरांत पोहोचवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Shivneri Is A Symbol Of Inspiration, Red Fort Agra A Land Of Pride: CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या