विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती संशयास्पद असून, आयोगाने स्वतःची विश्वासार्हता धोक्यात घातल्याचा आरोप त्यांनी केला. Sanjay Raut
“ईव्हीएमवर ‘नोटा’चा पर्याय कायदेशीररित्या उपलब्ध असताना कोणतीही निवडणूक बिनविरोध कशी होऊ शकते?” असा सवाल करत राऊत यांनी बिनविरोध निवडीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नोटा हाही मतदाराचा अधिकार असून, अशा परिस्थितीत बिनविरोध निवड जाहीर करणे म्हणजे मतदारांच्या हक्कांवर गदा आणण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने काही प्रकरणांत कारवाई न केल्याबाबत राऊत म्हणाले की, “संवैधानिक संस्थांकडून धाडस आणि स्वायत्तता अपेक्षित असते. मात्र सध्या आयोगाकडून ती दिसून येत नाही.” निवडणूक आयोगाने आपल्या घटनात्मक जबाबदाऱ्या अधिक ठामपणे पार पाडाव्यात, असेही त्यांनी सूचित केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी कायदेशीर तरतुदी समजून घेऊनच वक्तव्ये करावीत. “कायदा समजून न घेता बोलल्यास गोंधळ निर्माण होतो,” असा टोला त्यांनी लगावला.
कल्याण–डोंबिवली आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेल्या उमेदवारी माघारींबाबत बोलताना राऊत यांनी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला. “जसे आमदार फोडण्यासाठी पैशांचा वापर झाला, तसेच प्रकार उमेदवारांच्या माघारीतही दिसत आहेत,” असे ते म्हणाले. मात्र जनता हे सर्व लक्षात घेत असून योग्य वेळी उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येचा उल्लेख करत, “राज्यात गुन्हेगारी वाढत असून त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल,” असे राऊत म्हणाले.
Question mark on fairness, Sanjay Raut strongly attacks the Election Commission
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन