विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधू मुंबईसाठी वचननामा प्रकाशित करणार आहेत. ‘मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा’ असे या वचननाम्याला नाव देण्यात आले आहे. Raj–Uddhav Thackeray
ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेपूर्वी शुक्रवारी आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईसाठी वचननामा सादर केला होता. हा वचननामा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यानुसार शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला. विशेष म्हणजे राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी हा क्षण विशेष ठरला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे इथे आले याचा आनंदच आहे. आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करत आहोत. या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे. हा वचननामा आपल्या माध्यमातून सादर केला आहे.
आता झुंडशाही सुरू झाली आहे. मतचोरी त्यांची उघडकीस आणल्यानंतर त्यांनी आता उमेदवार पळवणे सुरू केले आहे. बिनविरोध निवडणूक प्रक्रिया जे ते राबवत आहेत, हे लोकशाचा अपमान आहे. राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. त्यांच्यावर राज्य निवडणूक आयोगाने कारवाई करायला पाहिजे. कारण विधानसभा अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो आणि तो कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी किंवा समर्थनासाठी जाऊ शकत नाहीत. परंतु, त्यांनी संरक्षण काढून घेण्याचे आदेश जे काही दिले, हा त्यांना अधिकार बाहेर नसतो, विधानसभेत असू शकतो.
उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर देखील टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाल्याची टीका त्यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. तसेच राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जिथे बिनविरोध निवडणुका झाल्या, तिथे आयोगाने पुन्हा निवडणुका घ्यायला पाहिजेत, अशी देखील मागणी उद्धव ठाकरेंनी केली.