Sahitya Sammelan : सातारा साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी आंदोलन; घोषणाबाजीने समारोप सोहळ्यात गोंधळ

विशेष प्रतिनिधी

सातारा: Sahitya Sammelan साताऱ्यात आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यावेळी महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी पुन्हा एकदा आंदोलनाचा आवाज उठला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी करत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ संमेलनस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.Sahitya Sammelan

रविवारी संमेलनाचा चौथा आणि समारोपाचा दिवस असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारोप सोहळा सुरू होताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मुख्य मंडपात दाखल झाले. “बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”, “मराठी भाषिकांवर अन्याय थांबवा” अशा घोषणा देत त्यांनी फलक झळकावले. अचानक झालेल्या घोषणाबाजीमुळे उपस्थितांमध्ये क्षणभर गोंधळ उडाला.Sahitya Sammelan



परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलकांना अडवले. त्यानंतर आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले. सीमाप्रश्न गेली अनेक दशके प्रलंबित असून महाराष्ट्र शासनाने या विषयावर अधिक ठाम आणि सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

बेळगावहून आलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते प्रकाश मरगळे यांनी सांगितले की, सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी गेली सुमारे ७० वर्षे लढा सुरू आहे. मात्र, या प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षित गांभीर्य दाखवले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, सुनावणीच्या वेळी कर्नाटक सरकारकडून मंत्री उपस्थित राहतात; परंतु महाराष्ट्राकडून अनेकदा केवळ वकीलच हजर राहतात, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीमाभागात मराठी भाषेतील फलक काढून टाकणे, कन्नड भाषेची सक्ती करणे आणि मराठी भाषिकांवर दबाव टाकणे, अशा प्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठीच मराठी साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावर आंदोलन करावे लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या प्रश्नावर साहित्य संमेलनातच आवाज उठवण्याचा निर्णय जाणूनबुजून घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनामुळे समारोप सोहळा काही वेळ थांबवावा लागला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कार्यक्रम पुन्हा सुरळीत सुरू झाला. सीमाप्रश्नी पुन्हा एकदा सार्वजनिक व्यासपीठावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने, या प्रश्नावर महाराष्ट्र शासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Border Dispute Protest Disrupts Sahitya Sammelan Finale in Satara

महत्वाच्या बातम्या