राणेंना संपवणे शक्य नाही; कुटुंब एकसंध : नारायण राणे यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

कणकवली : भल्याभल्यांना पुरून उरलो आहे. माझ्या विरोधात सर्व काही करून झाले, मात्र विरोध करणारे सगळे थकले आहेत. मी कोणाला घाबरत नाही. राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाही. राणे कुटुंब एकसंध आहे. पक्ष वेगळे असले तरी राणे वेगळे होणार नाहीत. कार्यकर्त्यांनी डगमगू नये. मी समर्थ आहे, असा विश्वास भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली येथे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. Narayan Rane

खासदार राणे म्हणाले, “जिल्ह्यात राजकारणाला थारा देऊ नका. माझ्या रस्त्यात आलात तर थारा देणार नाही. महायुतीचे कार्यकर्ते एकसंध राहा. हा मेळावा आयोजित करण्याची वेळ का आली, कोणामुळे आली आणि कशासाठी आली, हे सर्वांना माहीत आहे. मी भाजपमध्ये प्रवेश केला, त्याच वेळी स्पष्ट सांगितले होते की भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. याच पक्षात मी काम करत राहणार आहे. त्यामुळे चर्चेची गरज नाही. स्वाभिमानाने जगणे हीच माझी वृत्ती आहे.”



ते पुढे म्हणाले, “ईश्वराने जन्माला घातले ते पदासाठी की काय, असा कधी कधी प्रश्न पडतो. अनेक पदे भूषविली आणि त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जनतेसाठी, विकासासाठी काम केले. शिवसैनिक म्हणून सुरुवात केली आणि वर्षभरात नगरसेवक झालो. मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक, चेअरमन झालो. १९९० मध्ये कार्यकर्ते, जनता आणि देवांच्या आशीर्वादाने कणकवलीचा आमदार झालो.”

“मला संधी मिळाली तर जिल्ह्यातील गरिबी संपवायची, असा संकल्प केला होता आणि त्यात मी यशस्वी झालो आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत दरडोई उत्पन्न तीन लाख रुपये करण्याचे उद्दिष्ट आहे. येथील जनतेसाठी सुख, समृद्धी निर्माण करायची आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“मी कोकणासाठी वेडा आहे. जन्मगाव, येथील निसर्ग आणि माणसांसाठी माझे प्रेम आहे. मला फक्त येथील जनता हवी आहे, हीच माझी खरी संपत्ती आहे. आतापर्यंत दहा पदे भूषविली, ती तुमच्या, जनतेच्या आणि देवाच्या आशीर्वादामुळे. मी कोणापेक्षा कमी आहे, असे मला कधी वाटले नाही. मी कमी नाही आणि कधीच कमी पडणार नाही,” असे राणे म्हणाले.

“१९९० नंतर मी सिंधुदुर्गात विकास आणला. रस्ते आणि वाहतुकीचे जाळे उभे केले. राणेंपासून दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये वाटले जातात, मात्र माझे कार्यकर्ते निष्ठेने माझ्यासोबत राहिले. तुम्हीही पक्ष सांभाळा, निष्ठावंत राहा. मला स्वार्थी लोक नकोत. मी कधीच स्वार्थी लोक जोपासले नाहीत. जे होते ते गेले आणि आता दारोदारी ठोकरा खात आहेत,” असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.

“Ranes Cannot Be Finished; Family Stands United,” Asserts Narayan Rane

महत्वाच्या बातम्या