Chhagan Bhujbal छगन भुजबळ यांनी फेटाळून लावली विलीनीकरणाची चर्चा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे का? ही चर्चा आज, उद्या, महिना किंवा 2 महिन्यांनीही करता येईल. या प्रकरणी घाई करण्याची काहीच गरज नाही. दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी फेटाळून लावली. Chhagan Bhujbal

पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यात. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना जे योग्य वाटतील त्यांना बोलावून या मुद्यावर चर्चा करतील. शेवटी एवढा मोठा निर्णय दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करूनच होईल. त्यावर एवढी घाई करण्याची गरज नाही. परंतु आज ते ठरलेच होते, ते झालेच पाहिजे असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही. नवीन कॅप्टन आलेत. त्यांना बसू द्या. त्यांना काम करू द्या. त्यांना समजून घेऊ द्या.



त्यानंतर त्या काय करायचे ते पाहतील. आज आमच्यापुढे हा विषय खरोखरच नाही. सुनेत्रा पवार स्थिर स्थावर होणे व त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करणे हाच आमच्यापुढे प्राधान्यक्रमाचा विषय आहे.
छगन भुजबळ म्हणाले, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय 100 टक्के ठरला आहे. त्यामुळे याविषयी शंकाकुशंका घेण्याची काहीच गरज नाही. हा निर्णय झाला आहे. या प्रकरणी मोघम बोलण्यात काही अर्थ नाही.

आम्ही कॅप्टन नेमले आहेत. ते विचार करतील. तेच पाहतील काय करायचे ते. ते आमदारांचीही बैठक घेतली. 3-4 दिवसांनी शपथविधी घेतला तर फार घाई झाली असे म्हणायचे आणि दुसरीकडे पहिल्या दिवसापासून विलीनीकरणाची चर्चा घडवून आणायची ही घाई नाही का? रोज तेच – तेच सुरू आहे. थोडे थांबले पाहिजे.

Chhagan Bhujbal Dismisses Merger Speculation

महत्वाच्या बातम्या