Devendra Fadnavis आखाती देशात अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी आणणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारकडून विमाने उपलब्ध हाेत आहेत. आखाती देशात अडकलेल्या सर्व भारतीयांना परत मायदेशी आणणार आहाेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. Devendra Fadnavis

आमदार संजय केनेकर यांनी आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्याबाबतचा प्रश्न आ) विधान परिषदेत उपस्थित केला. यावेळी निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकार सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे आणि लोकांची सुरक्षितता व युद्धाची परिस्थिती यातून लोकांना परत आणण्याकरता सगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. अनिल परब म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखाती देशात अडकलेल्या 164 लोकांना मायदेशात आणायची व्यवस्था एक खाजगी विमान पाठवून केली, अशी बातमी आम्ही ऐकली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आहे. जर उपमुख्यमंत्री स्वतःची ताकद लावून 164 लोकांना आणत असतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दोन पावलं पुढे असायला पाहिजे. परंतु मुख्यमंत्र्यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्र सरकार भारतीयांना परत आणण्यासाठी काय उपाययोजना करणार आहे? याच्या बाबतीमध्ये प्रचंड संभ्रम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात महाराष्ट्र सरकारची भूमिका मांडावी. तसेच जर त्यांनी वैयक्तिक प्रयत्न करून भारतीयांना परत आणले तर त्यांचे देखील अभिनंदन आहे.

महाराष्ट्र सरकारची भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युद्ध सुरू झाल्यानंतर एअरस्पेस बंद झाल्या आहेत. त्यामुळे आखाती देशात अडकलेले भारतीय पर्यटक किंवा व्यवसायाकरता तिकडे गेलेले जे लोक आहेत, त्यांचे मेसेज आम्हाला येत आहेत. त्यामुळे आखाती देशात अडकलेल्या लोकांना संपर्कात केंद्र सरकारचे परराष्ट्र मंत्रालयाने संपर्क केला आहे. तसेच आखाती देशातील भारताच्या एम्बेसीला अ‍ॅक्टिव्हेट केलं असून सगळ्यांना एम्बेसीसोबत संपर्क साधायला सांगितला आहे. पण एम्बेसीला संपर्क साधून काही होणार नाही. त्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आपण भारतीयांना परत आणण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच आपण व्हॉट्सॲप नंबर जारी केला आहे. अडलेले लोक आमच्याशी संपर्क करत आहेत. तिथे अडकलेल्या लोकांच्या अडचणी दूर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यांना भारतात परत आणण्याच्या दृष्टीने देखील सगळे प्रयत्न सुरू केलेले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीने भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी अडकलेल्या त्या ठिकाणाहून परत आणून अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं काम केलं आहे. कारण राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून भूमिका मांडली होती की, महाराष्ट्रातले लोक तिथे अडकले आहेत त्यांना परत आणण्याकरता आम्ही व्यवस्था करू इच्छितो. परंतु केंद्र सरकारने सांगितलंय की, सगळी राज्ये असे प्रयत्न करतील, तर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होईल आणि आखाती देशात एअरस्पेस देखील सुरक्षित नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून जी विमानं उपलब्ध होत आहेत, त्यामधून भारतीयांना परत आणले जात आहेत. परदेशात अडकलेले जे काही आपले लोक आहेत, त्या सगळ्यांना पूर्ण सुरक्षिततेतून आपण परत आणू, असा विश्वासही देवेंद्र फडणीवस यांनी सभागृहात व्यक्त केला.

Devendra Fadnavis confident that all Indians stranded in Gulf countries will be brought back home

महत्वाच्या बातम्या