13,995 कोटींचा पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; पाणीपुरवठा विभागाला सर्वाधिक तरतूद

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी तयार केलेला सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा १३,९९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी सादर केला. हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. प्रशासनाने तयार केलेल्या अर्थसंकल्पानंतर स्थायी समितीकडून मुख्यसभेसमोर अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. PMC Budget

शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण यांसारख्या मूलभूत नागरी सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागाला सर्वाधिक २,०७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाढत्या शहरासाठी पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यातून स्पष्ट होते.



यासोबतच महत्त्वाच्या विभागांसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पथ विभागांसाठी ₹१,८६६ कोटी, घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी ₹१,३९० कोटी, मलनिस्सारण प्रकल्पांसाठी ₹१,२१६ कोटी, वाहतूक नियोजन व पायाभूत सुविधा ₹७४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रासाठीही महत्त्वाची तरतूद करण्यात आली असून प्राथमिक शिक्षण विभागाला ₹९७९ कोटी देण्यात आले आहेत. या निधीतून महापालिकेच्या शाळा व शैक्षणिक सुविधा मजबूत करण्याचा उद्देश आहे.
यासोबतच बांधकाम विभागासाठी ₹६५० कोटी, विद्युत विभाग ₹२६५ कोटी, उद्यान विभाग ₹२०५ कोटी, सामाजिक विकास विभाग ₹१४३.५० कोटी, आरोग्य विभाग ₹८८ कोटी , नगररचना विभाग ₹६४.५० कोटी, पर्यावरण विभाग ₹५१.५९ कोटी, माहिती व तंत्रज्ञान विभाग ₹५६.७३ कोटी, वारसा संवर्धन कक्ष ₹२८.५० कोटी आणि सांस्कृतिक केंद्र विभाग ₹१७१.३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेचा हा अर्थसंकल्प शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, सार्वजनिक सेवा सुधारणा आणि वाढत्या नागरी गरजा पूर्ण करण्यावर केंद्रित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थायी समितीकडून चर्चा व छाननी झाल्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.

13,995 Crore PMC Budget Presented; Water Supply Department Gets Highest Allocation

महत्वाच्या बातम्या