पालखी सोहळ्याचे ठिकाण बदलण्यावरून भवानी पेठेत संताप; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा!

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुण्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावरून आता संघर्षाची ठिणगी पडली आहे. पुण्यातील भवानी पेठ परिसरात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या पालखी मुक्कामाचे किंवा विसाव्याचे ठिकाण बदलण्याच्या हालचाली आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

या एका बातमीने संपूर्ण भवानी पेठेत संतापाची लाट उसळली असून, स्थानिकांनी आळंदी विश्वस्थानाच्या या संभाव्य निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

श्रद्धेचा विषय, केवळ व्यवस्थेचा नाही!

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर शेकडो वर्ष जुना आहे, मंदिराची लांबी रुंदी कमी आहे. आणि लाखो वारकरी आणि पुण्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात, गर्दीच्या नियोजनासाठी पालखीचे ठिकाण बदलण्याचा विचार सुरू आहे. मात्र, भवानी पेठेकरांसाठी हा केवळ जागा बदलण्याचा तांत्रिक विषय नाही. स्थानिकांच्या मते, “ही अनेक वर्षांची परंपरा आणि लाखो विठ्ठल भक्तांच्या भावनिक श्रद्धेशी जोडलेला विषय आहे.” पालखी सोहळा जेव्हा शहरात येतो, तेव्हा भवानी पेठेतील प्रत्येक घर आणि गल्ली भक्तीत न्हाऊन निघते. अशा वेळी परंपरेत हस्तक्षेप करणे म्हणजे भाविकांच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सर्व संघटना एकवटल्या; एकमुखी विरोध या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भवानी पेठेतील सर्व गणेश मंडळे, भजनी मंडळे, व्यापारी संघटना आणि विविध सार्वजनिक संस्थांनी एकत्र येत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी एकमुखाने या निर्णयाला विरोध करण्याचा ठराव मंजूर केला. “प्रशासनाने स्थानिकांना विश्वासात न घेता असा कोणताही निर्णय घेऊ नये. जर मुक्कामाचे ठिकाण बदलले, तर परिसरातील व्यापार आणि भक्तीचे वातावरण विस्कळीत होईल,” असे मत व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडले.

प्रशासनाला आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा स्थानिक नागरिकांनी आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “जर प्रशासनाने हा आत्मघातकी निर्णय तातडीने मागे घेतला नाही, तर भविष्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. रस्ते अडवून आणि लोकशाही मार्गाने आम्ही आमचा हक्क मिळवू,” असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. या वादामुळे भवानी पेठेत सध्या तणावाचे आणि संतापाचे वातावरण असून, स्थानिक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विठ्ठल भक्तांवर अन्यायाची भावना पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणे हे पुणेकर आपले कर्तव्य समजतात. भवानी पेठेतील नागरिक पिढ्यानपिढ्या ही सेवा करत आले आहेत. ठिकाण बदलल्यास या सेवेच्या संधीवर गदा येईल आणि विठ्ठल भक्तांवर हा एक प्रकारचा अन्याय ठरेल, असे बोलले जात आहे. आता या वादावर पडदा पडणार की आंदोलनाचा भडका उडणार, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Outrage in Bhawani Peth over change in Palkhi Sohala location; citizens warn of protest.

महत्वाच्या बातम्या