विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील सिंहगड रस्त्यालगत नांदोशी येथे उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी रुग्णालय प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला यापुढे ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ असे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा विश्वस्त मंडळाने केली आहे. यापूर्वी या प्रकल्पाचे नाव ‘लता मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ असे प्रस्तावित होते. मात्र, भारतरत्न स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या सोबतच ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सन्मान म्हणून या नावात बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजित कोनशिला समारंभात बदल करण्यात आला असून, त्याऐवजी ‘संकल्प आणि श्रद्धांजली सभा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सभा गुरुवार, दि. 16 एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता प्रकल्पाच्या ठिकाणी पार पडणार आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच खुला ठेवण्यात आला आहे.
या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असणार आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मंगेशकर आणि भोसले कुटुंबीयांचीही उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान रुग्णालय उभारणीचा संकल्प व्यक्त करण्यात येणार असून, आधुनिक आरोग्यसेवा सुविधांनी सुसज्ज असे हे रुग्णालय उभारण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार आहे. त्याचबरोबर, भारतीय संगीतविश्वाला सुवर्णकाळ देणाऱ्या लता मंगेशकर आणि आशा भोसले या दिग्गज कलावंतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. संगीत आणि सेवा या दोन क्षेत्रांचा संगम साधणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नांदोशी येथे उभारण्यात येणारा ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ हा प्रकल्प पुणे आणि परिसरातील नागरिकांस सुविधा उपलब्ध करून ठेवणारा ठरणार आहे.
‘Resolution and Tribute Meeting’ on April 16 at Nandoshi; Hospital named ‘Lata Asha Mangeshkar Institute of Medical Sciences’
महत्वाच्या बातम्या
- CM : महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन, मुख्यमंत्र्यांची भावना
- Amol Mitkari : अमोल मिटकरींनी यांची ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक
- “महात्मा फुले यांच्या विचारांची आज सर्वाधिक गरज” – अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात व्यक्त केली खंत!
- भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये! मोठा अनर्थ टळला..