अशोक खरात च्या निकटवर्तीय शेळकेंचा अपघातात मृत्यू!नेमका कसा झाला अपघात?

विशेष प्रतिनिधी

पुणे:समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय डॉ. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे.

कसा झाला अपघात?

जितेंद्र शेळके अपघात प्रकरणात शेळके हे स्वतः गाडी चालवत होते. शेजारी पत्नी आणि मुलगा मागे बसला होता. या अपघातात जितेंद्र शेळके आणि पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. जितेंद्र शेळके यांना गाडी चालवताना डुलका लागला असून त्यातून हा अपघात घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातानंतर कंटेनर चालक हा पळून गेला असून त्याचाही शोध पोलीस घेत आहेत.



जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे परतत असताना कोपरगाव-वैजापूर हद्दीत त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून भीषण धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. या अपघातात डॉ. जितेंद्र शेळके (50), पत्नी अनुराधा जितेंद्र शेळके (45) यांचा मृत्यू झालाय. तर मुलगा सुचित जितेंद्र शेळके (14) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. जितेंद्र शेळके (वय 50) हे शिर्डी परिसरातील एक प्रतिष्ठित नाव होते. ते केवळ उद्योजकच नव्हते, तर ‘सिल्व्हर ओक डेव्हलपर्स’ या नावाने त्यांचा मोठा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता. व्यवसायासोबतच त्यांची स्वतःची शैक्षणिक संस्था देखील होती, ज्या माध्यमातून जितेंद्र शेळके हे शिर्डी परिसरात अनेकांना चांगलेच परिचित होते.

खरात आणि संबंध काय होते?

भोंदू अशोक खरात याच्याशी शेळके यांचे संबंध अगदी जुने होते. 2023 मध्ये अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टचे ते सदस्य बनले. यानंतर 2025 मध्ये ते शिवनिका संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले होते. अशोक खरात याच्या शिर्डीतील जमीन व्यवहार गुन्ह्यात शेळके हे महत्त्वाचे साक्षीदार होते. अशोक खरात याच्या अटकेनंतर शिर्डी पोलिसांकडून जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली होती.

Ashok Kharat’s close aide Shelke dies in an accident! How exactly did the accident happen?

 

महत्वाच्या बातम्या