सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही भाजपकडून विधान परिषद निवडणूक लढविणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आगामी चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उद्योगपती अरुण लखानी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही असलेले अरुण लखानी यांना भाजप उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
रविवारी दिल्लीत नरेंद्र मोदी यांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाचे निमंत्रण पंतप्रधानांना दिले. यावेळी रेवती सुळे आणि त्यांचे होणारे पती सारंग लखानी हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतरच अरुण लखानी यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चांना अधिक वेग आला आहे.



विदर्भातील राजकारणात लखानी कुटुंबाचे व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे नेटवर्क मानले जाते. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद मजबूत असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सामाजिक समीकरणे आणि वैयक्तिक संपर्क यांना मोठे महत्त्व असते. त्यामुळे भाजप “जिंकणारा चेहरा” म्हणून अरुण लखानी यांच्यावर डाव खेळू शकते, अशी चर्चा आहे.
अरुण लखानी हे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी पाणी आणि महामार्ग प्रकल्पांच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. श्री. अरुण लखानी हे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.
अरुण लाखानी यांची भाजपच्या ‘सह-कोषाध्यक्ष’ (Co-Treasurer) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण लाखानी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत.
या संभाव्य उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत राजकीय संदेश काय जाईल, तसेच शरद पवार गटाची भूमिका काय असेल याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये या चर्चेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

Supriya Sule’s soon-to-be relative may contest Legislative Council polls on BJP ticket

महत्वाच्या बातम्या