विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरात काँग्रेस नेते बंटी पाटील यांची बदनामी करणारे फ्लेक्स लावण्यात आल्याच्या प्रकरणावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या प्रकरणी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
शहरातील विविध भागांमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी बंटी पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर असलेले फ्लेक्स लावल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या फ्लेक्समुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा प्रकार जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात येत आहे.
प्रशांत जगताप यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारचे फ्लेक्स लावून शहराचे विद्रूपीकरण करण्यात आले असून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच दोन गटांमध्ये भांडणे लावणे, दंगल भडकवणे आणि काँग्रेस पक्ष तसेच बंटी पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
“जो कोणी या प्रकारामागे असेल, त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. शहरात द्वेषाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी पाठीशी घालू नये,” अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित परिसरातील माहितीच्या आधारे फ्लेक्स लावणाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे.
या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून आगामी काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Congress aggressive in Bunty Patil’s defamation flex case; Run to the police for action
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश