विशेष प्रतिनिधी
पुणे : NCP पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमधील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने अखेरच्या क्षणी नाट्यमयरीत्या माघार घेतल्यामुळे महायुतीचा मार्ग सुकर झाला. या संपूर्ण घटनाक्रमावर पुणे शहर काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संताप व्यक्त केला असून, हा काँग्रेस पक्ष आणि मतदारांचा विश्वासघात असल्याची टीका केली आहे.NCP
शहाराध्यक्ष जगताप म्हणाले की, या निवडणुकीत भाजप आणि महायुती सरकारच्या विरोधात एकजुटीने लढण्यासाठी सर्व विरोधकांची तयारी सुरू होती. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे मतदारांची म्हणजेच लोकप्रतिनिधींची संख्या सर्वाधिक होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही घटकांपेक्षा काँग्रेसची मतदारांची संख्या पुण्यात जास्त असल्यामुळे काँग्रेसने या जागेवर आपला हक्काचा दावा केला होता. या संदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी देखील स्थानिक पातळीवर सकारात्मक चर्चा झाली होती. जागावाटपाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे आणि सातारा या दोनच जागांची मागणी लावून धरली. महाराष्ट्रातील एकूण १७ जागांपैकी आम्हाला फक्त पुणे आणि साताऱ्याची जागा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी शरद पवार यांच्या पक्षाने केली. महाविकास आघाडीचा धर्म पाळला जावा आणि भाजपविरोधात एकजूट राहावी, या उद्देशाने काँग्रेसने अत्यंत मोठ्या मनाने आणि ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेतून आपली हक्काची पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडली होती, असे त्यांनी सांगितले.NCP
उमेदवारी अर्ज मागे घेणे हा ‘विश्वासघात’
काँग्रेसने मैत्रीचा धर्म पाळत जागा सोडली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने अखेरच्या दिवशी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे हे बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आधी आग्रहाने या जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेर माघारी घेतला, हा काँग्रेस पक्षाचा विश्वासघात आहे. काँग्रेस पक्ष या जागेवर भाजपविरोधात ताकदीने लढून मतदारांना एक सकारात्मक संदेश देणार होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसमोर शरणागती पत्करली, अशा शब्दात जगताप यांनी संताप व्यक्त केला.
भविष्यात स्वबळावर लढणार
झालेला हा विश्वासघात केवळ काँग्रेस पक्षाचा नसून पुण्यातील मतदारांचाही आहे, असे मत जगताप यांनी व्यक्त केले. काँग्रेस नेत्यांपेक्षा मतदारांमध्ये या शरणागतीबद्दल जास्त संतप्त भावना आहेत. त्यामुळे भविष्यात काँग्रेस पक्ष कोणावरही अवलंबून न राहता स्वबळावर लढण्याचा निश्चितपणे नारा देईल, असा इशारा त्यांनी दिला. जर सहकारी पक्ष महायुतीसमोर असे सरेंडर होणार असतील, तर मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी काँग्रेसला स्वबळाचा मार्ग स्वीकारावाच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार कैफियत
पुण्यात घडलेला हा संपूर्ण राजकीय घटनाक्रम आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी घेतलेली माघार यामागील नेमकी काय कारणे आहेत, याबद्दल संतप्त आहे. त्यामुळे पुण्यातील हा संपूर्ण घटनाक्रम आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना येत्या काळात काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर निश्चितपणे मांडल्या जातील आणि पुढील रणनीती ठरवली जाईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले. या धक्कादायक घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमधील विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी काळात याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
NCP (Sharad Pawar) backs out, Congress cries betrayal; warns of going solo in future
महत्वाच्या बातम्या