विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devedra Fadanvis मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने तब्बल २२ हजार ६११ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग, फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रोच्या दोन नवीन मार्गांना हिरवा कंदील दाखविण्यात आला.Devedra Fadanvis
मंत्रालयात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.Devedra Fadanvis
घोडबंदर मार्गावर १७ हजार कोटींचा भुयारी मार्ग आणि उन्नत पूल
या प्रकल्पांतर्गत गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान ५.८६ किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान ९.५८ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल बांधण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांची एकूण किंमत १७ हजार ३६ कोटी रुपये आहे.
भुयारी मार्ग अत्याधुनिक टीबीएम (टनल बोरिंग मशीन) तंत्रज्ञानाद्वारे उभारला जाणार असून त्याचा व्यास १४ मीटर असेल. हा प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर वसई खाडीला समांतर जाणाऱ्या उन्नत पुलावर वाहनांना ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे.
या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ यांदरम्यानची वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. घोडबंदर मार्गावरील वाढता वाहतूक ताण आणि जड वाहनांची गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे.
बैठकीत सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग १ए आणि मार्ग २ या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांची एकत्रित किंमत ५ हजार ५७५ कोटी रुपये आहे.
मार्ग १ए हा सागर संगम ते सीबीडी बेलापूर, तर मार्ग २ हा पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-४) असा असणार आहे. या विस्तारामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा २८ किलोमीटरचा अखंड मेट्रो कॉरिडॉर उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पात मार्ग १ए वर दोन आणि मार्ग २ वर अकरा नवीन स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात या मेट्रो मार्गाचा दररोज सुमारे १२ लाख प्रवाशांना लाभ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घोडबंदर मार्गावरील भुयारी मार्ग आणि उन्नत पूल प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (BOT) मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ उपलब्ध करून दिले जाणार असून, प्रकल्प परिसरासाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, वेगवान आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Major relief for Mumbai Metropolitan Region traffic; ₹22,611-crore tunnel, elevated bridge and metro projects approved
महत्वाच्या बातम्या