माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत, पाचशे वारकऱ्यानाच प्रवेश

विशेष प्रतिनिधी

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आळंदी परिसरातील पूरस्थिती, मुसळधार पाऊस आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

देवस्थान समितीच्या निर्णयानुसार, रथापुढील १ ते २७ दिंडींमधील प्रत्येकी १० वारकरी आणि रथामागील १ ते ५६ दिंडींमधील प्रत्येकी १० वारकरी, अशा एकूण ५६० वारकऱ्यांनाच प्रस्थान सोहळ्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय दिंडी प्रमुख, मानकरी आणि प्रतिष्ठित व्यक्ती अशा ५०० जणांनाही प्रवेश दिला जाणार आहे.



तसेच मानाचे खांदेकरी, देवस्थान समितीचे कर्मचारी, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि इतर आवश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसह एकूण १,६६० व्यक्तींच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे.

देवस्थान समितीने वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन करत, पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत गर्दी करू नये, असे सांगितले आहे. स्वतःची सुरक्षितता लक्षात घेऊन वारकऱ्यांनी थेट पालखीच्या पुढील मुक्कामाच्या ठिकाणी जावे, असे आवाहन समितीने केले आहे.

आळंदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वारकऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी प्रशासन, पोलीस आणि देवस्थान समितीने संयुक्तपणे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पालखी मार्गावरील सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून, पुढील मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Dnyaneshwar Maharaj Palkhi Departure to Be Held with Limited Attendance, Only 500 Warkaris Allowed

महत्वाच्या बातम्या