विशेष प्रतिनिधी
मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. Shiv Sena Leader
शास्त्रीनगर रुग्णालयातून समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी तीव्र वाद घालताना आणि धक्काबुक्की करताना स्पष्ट दिसत आहेत. वाद सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर परिस्थितीचे गांभीर्य पाहून फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, फुटेजमध्ये दिसत असल्यानुसार, संतापलेल्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला डॉक्टरच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून थेट खाली पाडून दिला.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, धमकावणे आणि महिला कर्मचाऱ्यांवर हात उचलल्याच्या या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे अस्तित्वात असतानाही, थेट लोकप्रतिनिधींकडूनच असा कायदा हातात घेतला गेल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वैद्यकीय संघटनांनी लावून धरली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने आपल्या समर्थकांसह शासकीय रुग्णालयात जाऊन थेट महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नेमके का मारहाण केली? तेथील वाद नेमका कोणत्या कारणावरून पेटला होता? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, प्रत्यक्ष पुराव्यांसहित सीसीटीव्ही फुटेज चव्हाट्यावर आल्यानंतर आता पोलीस आणि गृह विभाग यावर काय पावले उचलणार आणि सत्ताधारी पक्षाच्या या नगरसेवकावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.