विशेष प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका करत भाजपवर भ्रष्टाचार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, वाढती गुन्हेगारी, आमदारांच्या पक्षांतराचा प्रश्न आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर निशाणा साधला. भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर त्यांच्यापैकी अनेकांना पक्षात प्रवेश दिल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारला जाब विचारला. Supriya Sule
“काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुम्ही त्यातलेच अर्धे नेते पक्षात घेतले. मग ते भ्रष्टाचारी होते की नव्हते? जर ते भ्रष्टाचारी नव्हते, तर खोटे आरोप केल्याबद्दल त्यांची माफी मागा. आता भाजपला भ्रष्टाचाराचा ‘भ’ काढण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे लाखो महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. “आधार आणि जनधन योजनेचे यश सरकार सांगते. मग लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिलांचे केवायसी का होऊ शकले नाही? योजनेत पुरुष आणि सरकारी कर्मचारी कसे लाभार्थी झाले? या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
निवडणुकीच्या काळातच तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरले जाते, असा आरोप करत त्यांनी सरकारला लक्ष्य केले. “निवडणूक आली की खात्यात पैसे जमा होतात आणि निवडणूक संपली की ते बंद होतात. मग विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे पेपर फुटतात तेव्हा तंत्रज्ञान कुठे जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबतही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. “भारत सरकारच्याच आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आज गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. ड्रग्ज गावागावांत पोहोचले असून पोलिसांचा धाक उरलेला नाही,” असे त्या म्हणाल्या.
काल एका डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकाने डॉक्टरांवर हात उगारला. अटक झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. अशा प्रकारची गुंडगिरी राज्यात खपवून घेतली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदारांच्या पक्षांतराच्या वाढत्या घटनांवर बोलताना सुळे यांनी संसदेच्या आगामी अधिवेशनात खासगी विधेयक आणणार असल्याची घोषणा केली. “एखादा लोकप्रतिनिधी ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला, त्याने पाच वर्षे पक्ष बदलता कामा नये. पक्ष बदलायचा असेल तर आधी राजीनामा द्यावा आणि पुन्हा जनतेचा कौल घ्यावा. लोकप्रतिनिधींना ‘कमोडिटी’प्रमाणे वागवण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
शरद पवार गटातील खासदार अस्वस्थ असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध आहे. आमचा कोणताही खासदार पक्षाविरोधात बोललेला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझा संपर्क फक्त माझ्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी झाला होता,” असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी, “अमोलदादांनी त्यांची भूमिका नंतर स्पष्ट केली आहे. माध्यमांनीही संपूर्ण संदर्भासह बातम्या द्याव्यात,” असे सांगितले. यावेळी त्यांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या विधानसभेतील कामगिरीचे कौतुक करत संसदेत राष्ट्रवादीचे खासदार जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडत असल्याचा दावा केला.
“Apologise for inducting tainted leaders”: Supriya Sule targets BJP
महत्वाच्या बातम्या