रामरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरेंना नीट रामरक्षा वाचताही येत नाही, मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : रामरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरेंना नीट रामरक्षा वाचताही येत नाही. उद्धव ठाकरे हे सध्या हताश आणि निराश झालेले असून, राजकारणात त्यांचे कोणतेही अस्तित्व उरलेले नाही, अशी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी उडवली. CM mocks Thackeray

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर हल्लाबाेल केला. उध्दव ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी किमान दोन पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाने करणं योग्य नाही. मागच्या वेळी ते रामरक्षा वाचू शकले नाही. जर त्यांची तयारी असेल तर मी देखील त्यांच्यासोबत रामरक्षा बोलायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा मला रामरक्षा आली नसती, तरी किमान वाचायला तर यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, हे कुठलं आंदोलन आहे तुमचं?



पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने पेपर फुटण्याआधीच प्रोॲक्टिव्ह कारवाई करून आंतरराज्य गुन्हेगारांना पकडले आहे. परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणूनच ती पुढे ढकलण्यात आली. राहुल गांधी हे बहुतांश वेळ परदेशात असतात, त्यामुळे त्यांना इथली योग्य माहिती नसते.

रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या मागणीनुसार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जुन्या कर्जमाफी योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीत सामावून घेण्यात आले आहे. तसेच 2026-27च्या नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली असून, 2025-26 ची परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. देशातील सर्वात मोठ्या अशा या कर्जमाफीचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एसटीच्या जागा विकल्या जात असल्याचा आरोप विरोधक आणि काही कामगार संघटना करत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, एसटीच्या एकाही जागेची विक्री होणार नसून जागेची मालकी कायम एसटी महामंडळाचीच राहील. केवळ दीर्घकालीन विकासासाठी या जागा भाडेतत्त्वावर दिल्या जातील. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आणि फायद्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

2008चा मुंबई दहशतवादी हल्ला हा आयएसआय (ISI) आणि काँग्रेसचा कट होता, या माजी गृहसचिव आर. व्ही. एस. मणी यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांनी मोठी चिंता व्यक्त केली. हे वक्तव्य अत्यंत धक्कादायक असून या प्रकरणाची योग्य आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

पेपरफुटी प्रकरणातील रद्द झालेल्या परीक्षेच्या नवीन तारखा राज्य सरकारकडून लवकरच घोषित केल्या जातील. शेतकरी कर्जमाफीच्या नव्या निकषांनुसार राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून वेगाने सुरू केली जाईल. तसेच, 2008 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत माजी गृहसचिवांनी केलेल्या नव्या दाव्याच्या अनुषंगाने सरकारकडून चौकशीचे आदेश दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

CM mocks Thackeray, says he cannot even recite the Ram Raksha despite politicising it

महत्वाच्या बातम्या