विशेष प्रतिनिधी
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक कथित आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. एकीकडे मोहिते पाटलांनी ही क्लिप एआयचा वापर करून व्हायरल केली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मोहिते पाटलांच्या विरोधात कायदेशीर फास आवळणार असल्याचा इशारा दिला आहे. यावरून आता पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. ( Solapur News )
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरस पंचायत समितीच्या उपअभियंत्यांमध्ये संवाद सुरू असल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये ते उपअभियंत्यांना शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याचे दिसून आले. ही क्लिप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आणि माहिते पाटलांवर सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली जात होती. मात्र आता मोहिते पाटलांनी समोर येत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही ऑडिओ क्लिप खरी नसून आधुनिक तंत्रज्ञान आणि सायबर टूल्सचा गैरवापर करून बनवली गेली आहे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणालेत की, ”सत्ता असो किंवा नसो आजतागायत सर्वच अधिकाऱ्यांशी मी आदरानेच बोललो आहे, यापुढेही बोलत राहणार आहे. माळशिरस पंचायत समितीच्या उपअभियंतांना दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप ही तंत्रज्ञानाच्या आधारे बनवण्यात आली आहे. माझ्यावर अतिप्रेम असणाऱ्या लोकांना मी कुठं ना कुठे सापडावे, ही कायम अपेक्षा असते”, असे म्हणत त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना टोला लगावला आहे. ( Jaykumar Gore VS Dhairyasheel Mohite Patil )
दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नुसती प्रतिक्रियाच दिली नाही तर या ऑडिओ क्लिपची कायदेशीर चौकशी करण्याचाही इशारा दिला आहे. ते म्हणाले, ”ऑडिओ क्लिपबाबत खासदार शंका व्यक्त करत असले तरी ते आणि त्यांचे समर्थक सोशल मीडियातून ‘मोहिते पाटील पॅटर्न कसा आहे. कोणी आमचे ऐकले नाही तर आम्ही कसे सांगतो’ याचे उदाहरण देताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचे वास्तव तपासावे लागेल”. विशेष म्हणजे जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांना एआयचा वापर करून क्लिप व्हायरल केल्याच्या दाव्यावरून डिवचले आहे. ”वेळ पडली खासदारांच्या आवाजाचे नमुनेही घेतले जातील. त्याची पडताळणी करून चौकशी केली जाईल. कुणाच्या मोबाईलवरून फोन आलेला आहे. त्याच्यात छेडछाड झालेली आहे की नाही? या तपासणीसाठी खूप मोठी यंत्रणा पोलीस दलाकडे आहे. त्यामुळे त्या ऑडिओ क्लिपची व्यवस्थित तपासणी होईल”, असे गोरेंनी स्पष्टपणे सांगितले आहे.
सोलापूरचे राजकारण तापणार
तसेच जो दोषी असेल तो कितीही मोठा असेल तरी त्याच्यावर कारवाई होईल. पण जो दोषी नाही, त्याने स्पष्टीकरण द्यायचे कारण नाही, असे सांगून गोरेंनी मोहिते पाटलांना टोला लगावला आहे. मात्र एकूणच मोहिते पाटलांच्या या कथित ऑडिओ क्लिपमुळे गोरेंच्या हाती आयते कोलीत लागले आहे. आता त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात कायदेशीर चौकशी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सोलापूरचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
War of words over alleged audio clip! Gore to tighten legal noose around Mohite-Patil.
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा