विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे महानगरपालिकेत पाणीकपातीच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये एक नाट्यमय संघर्ष पाहायला मिळत आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुण्यात पुन्हा एकदा पाणीकपात लागू करण्याची घोषणा केली होती. याला 24 तास उलटत नाहीत तोच आता महापौर मंजूषा नागपुरे यांनी हा निर्णय फिरवला असून सध्या तरी पाणीकपात होणार नसल्याचे जाहीर केले आहे. PMC Water Cuts
पुणे महापालिकेने आषाढी वारीनिमित्त काही दिवसांसाठी पाणीकपात ( water cuts ) मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बुधवारपासून पुन्हा शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले होते. पण महापौर मंजूषा नागपुरे यांनी थेट पत्रकार परिषद घेत हा निर्णय 22 जुलैपर्यंत लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी पुणेकरांना आवाहन करताना सांगितले की, “22 जुलैनंतर हवामान विभागाचा पावसाचा अंदाज, धरणांतील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची एकूण आवक याचा सविस्तर आढावा घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. नागरिकांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. मात्र, पुणेकरांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि काटकसरीने करावा.”
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ”शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत 50 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला धरण 90% भरल्याने कालव्याद्वारे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणेकरांवर लादण्यात आलेली पाणीकपात तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उपलब्ध पाण्याचा 22 जुलैनंतर आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाईल” असं मंजुषा नागपुरे म्हणाल्या.
स्वयंसेवी संस्थांनी घेतला आक्षेप
दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी पाणीकपात सुरू करावी लागणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सजग नागरिक मंचांने त्यावर आक्षेप घेतला होता. खडकवासला धरणसाखळीत जवळपास साडेसोळा टीएमसी पाणी शिल्लक असताना शहरात पुन्हा पाणीकपात करणे खरेच गरजेचे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्याची मागणी मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली होती.
दरम्यान, पालखी सोहळ्यानंतर पाणीकपातीचा पुढील निर्णय हा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल, असे महापौरांनी आधीच स्पष्ट केले होते. असे असतानाही, ही बैठक होण्यापूर्वीच आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्वतःहून पाणीकपातीचा निर्णय जाहीर करून टाकला. पण 24 तासांच्या आत हा निर्णय महापौरांकडून मागे घेण्यात आल्याने पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर पालिकेत नक्की काय राजकारण सुरू आहे, अशी चर्चा आता रंगली आहे. या अंतर्गत वादामुळे पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न आता राजकीय पटलावर आला आहे.
Water cut averted in Pune; Mayor overturns Commissioner’s decision.
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा