विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबीयांना प्रशासकीय कारवाईचा मोठा फटका बसला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सिया गोयलच्या वडिलांच्या पुण्यातील दुकानावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ( Tukaram Mundhe )
सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात ‘बी जी गोयल अँड कंपनी’ नावाचे मसाल्याचे मोठे दुकान आहे. या दुकानावर एफडीएच्या पथकाने 15 जुलै रोजी धाड टाकल्याची माहिती आहे. यावेळी एफडीएकडून दुकानातील हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. यानंतर दुकानातील मालाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप एफडीएने केला आहे.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत तब्बल 8 लाख रुपयांचा सुमारे 4 हजार किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. एफडीएच्या पथकाला या मालाच्या लेबलमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत. यामध्ये भेसळ असल्याचा दाट संशय एफडीएच्या पथकाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या दुकानावर एफडीएने कारवाई केली असून हे दुकान सील करण्यात आले आहे. ( Siya Goyal )
सियाच्या वडिलांना एफडीएची नोटीस
तसेच संस्थेकडील आवश्यक परवान्यामध्ये कोणतीही कायदेशीर दुरुस्ती न केल्यामुळे आणि अन्न सुरक्षा नियमांच्या तरतुदींचे सर्रास उल्लंघन केल्यामुळे, एफडीएने पुढील आदेश येईपर्यंत हे दुकान पूर्णपणे बंद करण्याची नोटीस सियाच्या वडिलांना बजावली आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गोयल कुटुंबियांवर झालेली ही अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सध्या पुण्यात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा आहे. लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून केतनची हत्या करण्यात आली होती. केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनचा काटा काढल्याचे समोर आले आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून ते दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
Tukaram Munde slams Siya Goyal’s father! Pune shop sealed by FDA
महत्वाच्या बातम्या