PMC: पुण्यातील 130 किलोमीटर रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार; 167 कोटींचा निधी मंजुर

विशेष प्रतिनिधी

पुणे: आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा मोठा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी तब्बल 167 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेसाठी आता महापालिकेने (PMC ) तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेनिमित्त 450 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात आली होती. त्याच पद्धतीने यंदाही रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. ( Pune Grand Tour )

या स्पर्धेसाठी शहरातील सुमारे 130 किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती आणि पुनर्डांबरीकरण केले जाणार आहे. यासाठी 167 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. या 167 कोटी रुपयांच्या पूर्वगणनपत्रकाला बुधवारी पुणे महापालिकेच्या पूर्वगणन समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया आणि निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रस्ते दुरुस्ती आणि पुनर्डांबरीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत.

तसेच स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार रस्ते असणे आवश्यक आहे. त्यानुसार रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी एका ठेकेदाराकडे एकाच टप्प्याचे काम देण्यात येईल असे महापालिकेच्या पथक विभागाचे प्रमुख राजेश बनकर यांनी सांगितले आहे. रस्त्यांची ही कामे चार टप्प्यांत विभागण्यात आली आहेत. आगामी काळात होणाऱ्या या स्पर्धेसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील काही तालुक्यातील मार्ग निश्चित करण्यात आला आहे.



स्पर्धेबरोबरच नागरिकांचाही फायदा
‘पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा असल्याने देश-विदेशातील स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारणे, वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि शहराची प्रतिमा उंचावणे यावर महापालिकेचा भर आहे. विशेष म्हणजे स्पर्धेनिमित्त केलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे शहरातील दैनंदिन वाहतुकीसाठी नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध होणार आहेत. खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि खराब झालेल्या मार्गांमुळे होणारा त्रासही कमी होण्याची अपेक्षा आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असून, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी पुणे अधिक सक्षम होईल. तसेच, भविष्यात अशा मोठ्या क्रीडा स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठीही शहराची पूर्ण तयारी असणार आहे.

रस्त्यांच्या कामाचे टप्पे

  • पहिला टप्पा: औंध, बाणेर, पाषाण, विद्यापीठ, रेंज हिल्स- 24.44 किमी
  • दुसरा टप्पा: सेनापती बापट रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, पर्वती पायथा, सारसबाग, खडकवासला- 37.02 किमी
  • तिसरा टप्पा: मध्यवर्ती पेठांचा भाग, शिवदर्शन, गंगाराम, कोंढवा, कॅम्प, येवलेवाडी इथून पुढे- 44.57 किमी
  • चौथा टप्पा: भैरोबा नाला, मगरपट्टा, मुंढवा, नॉर्थ मेन रोड, विधान भवन, गणेश रोड, गोखले रस्ता, डेक्कन- 28.72 किमी

130 km of roads in Pune to be upgraded to international standards; ₹167 crore fund approved.

महत्वाच्या बातम्या