Pune: हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोला आठवडाभरात परवानगी; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन!

विशेष प्रातिनिधी

पुणे: आयटीयन्सची लाईफलाईन ठरू पाहणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होण्यासाठी दिलेला १५ जुलैचा मुहूर्त आता हुकला आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने मेट्रो सुरू होण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता केंद्रीय विमान वाहतूक मंत्री यांनी हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आठवडाभरात परवानगी मिळेल, असे आश्वासन दिले आहे. ( Pune Mtero News )

खरं तर, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा माण ते बालेवाडी (१२ स्थानके) १५ जुलैपर्यंत सुरू करण्यात येईल, असे पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी १० जून रोजी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात ही मेट्रो अद्याप सुरू झालेली नाही. माण ते बालेवाडी दरम्यानच्या १२ स्थानकांची सुरक्षा तपासणी ‘मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून’ म्हणजेच ‘सीएमआरएस’कडून नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. पण, जोपर्यंत या तपासणीचा अंतिम अहवाल आणि व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेले ‘सुरक्षा प्रमाणपत्र’ मिळत नाही, तोपर्यंत मेट्रो सेवा सुरू करता येत नाही. तांत्रिक कामे पूर्ण झाली असली, तरी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे सध्या या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळालेला नाही.

‘सीएमआरएस’ ही संस्था विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित येत असल्याने मोहोळ यांनी मेट्रो रेल्वे सेफ्टी कमिशनर (सीएमआरएस) जनक गर्ग यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. त्यात त्यांनी ५ ते ८ जुलै दरम्यान हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची पाहणी झाली असून त्यात काही बदल सुचविले आहेत. त्याची तातडीने पूर्तता ‘पीआयसीटीएमआरएल’कडून होणे अपेक्षित आहे. ती झाल्यावर या मार्गावरील मेट्रोतून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘पीआयसीटीएमआरएल’चे प्रमुख अमितकुमार सैनी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, ‘सीएमआरएस’ सांगितलेले बदल आम्ही पूर्ण केले आहेत. त्याची माहिती गर्ग यांना पाठविली आहे. त्यामुळे आता प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठीची परवानगी अपेक्षित आहे. जनक गर्ग यांच्याशी गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर मोहोळ यांनी हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आठवडाभरात परवानगी मिळेल असे आश्वासन दिले आहे.



हिंजवडी आयटी पार्क परिसरात दररोज सुमारे १० लाख आयटी कर्मचारी आणि नागरिक प्रवास करतात. तीव्र वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रवासामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. मेट्रोमुळे या समस्येवर मोठा दिलासा मिळेल अशी आशा होती, पण या ‘तारख पे तारीख’च्या खेळामुळे आयटीयन्समध्ये आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता सुरक्षा प्रमाणपत्र नेमके कधी मिळणार आणि पुणेकरांची ही कोंडी कधी फुटणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune: Approval for Hinjawadi-Shivajinagar Metro within a week; assurance from Union Minister Murlidhar Mohol!

महत्वाच्या बातम्या