Hydrogen Train: हरित क्रांतीच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल; रुळावर धावली पहिली हायड्रोजन ट्रेन, पाहा वैशिष्ट्ये !

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: हरियाणातील जिंद रेल्वेस्थानकावरून देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 16) रोजी हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन उत्तर रेल्वेच्या जींद-सोनिपत रेल्वे मार्गावर धावणार आहे. हरित क्रांतीच्या दिशेने हे भारताचे मोठे पाऊल मानले जात असून भारतीय रेल्वेसाठीही ही ट्रेन ऐतिहासिक ठरणार आहे.

तब्बल 110 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1916 मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने जिंद-पानिपत रेल्वेमार्ग उभारला होता. रेल्वे रुळ पूर्ण झाल्यानंतर त्या काळातील ब्रिटिश अभियंते आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी याच ठिकाणी उभे राहून ग्रुप फोटो काढले होते. मात्र, त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की, याच रेल्वेमार्गावर 110 वर्षांनंतर भारताच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक ठरणारी देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. विशेष म्हणजे हायड्रोजन इंधनावर ट्रेन सुरू करणारा भारत जगातील पाचवा देश बनला आहे. सध्या जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनमध्येच हायड्रोजन ट्रेन धावते.

हरियाणातील जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकांदरम्यान ही ट्रेन धावेल. या मार्गावर 89 किमीचा प्रवास केवळ 2 तासांत पूर्ण होणार आहे. या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे ही ट्रेन डिझेलऐवजी हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानावर चालते. या प्रक्रियेत हायड्रोजन वायूपासून वीज तयार केली जाते आणि प्रदूषणकारी धुराऐवजी केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते. त्यामुळे ही पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था मानली जाते. भारतीय रेल्वेमध्ये हे आता एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. कारण सध्या भारतीय रेल्वेमध्ये आधुनिकीकरण, विद्युतीकरण आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्याच दिशेने हायड्रोजन ट्रेन हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या ट्रेनची आणखी वैशिष्ट्ये सांगायची म्हणजे, या ट्रेनची कमाल वेगक्षमता ताशी 110 किमी आहे, मात्र सध्या जिंद-सोनीपत मार्गावर ती ताशी 75 किमी या वेगाने धावणार आहे. याशिवाय या ट्रेनमध्ये एकूण 10 डब्बे (2 पॉवर कार आणि 8 प्रवासी डबे) आहेत. या ट्रेनमधून एकाच वेळी सुमारे 2,600 प्रवासी प्रवास करू शकतात. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात हा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. तिकिटाचे दर हे 5 रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत असणार आहे.

तसेच ही जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असेल. कारण सध्या जगभरात हायड्रोजन तंत्रज्ञानावर चालणाऱ्या बहुतांश ट्रेनमध्ये केवळ दोन ते तीन डबे असतात आणि त्या कमी अंतरासाठी वापरल्या जातात. हायड्रोजन पुरवठ्यासाठी भारतीय रेल्वेकडून जिंद येथे 3,000 किलोग्रॅम क्षमतेचे विशेष इंधन भरण्याचे स्थानक उभारले आहे. पर्यावरणाला फायद्यासह लाखो लिटर डिझेलची बचत या ट्रेनमुळे होणार आहे. ही ट्रेन पूर्णपणे ‘झिरो-एमिशन’ आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होईल. ट्रेनसाठी हायड्रोजनचा वापर अत्यंत उच्च दाबाने करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सेन्सर्स, गॅस डिटेक्शन सिस्टीम आणि ऑटोमॅटिक फायर सेफ्टी सिस्टीम बसवण्यात आली आहे.



या हायड्रोजन ट्रेनसाठी जिंद-सोनीपत मार्ग निवडण्यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे या मार्गावर वाहतूक कमी आहे. फक्त दररोज 8 ट्रेन धावतात. दुसरे दिल्लीपासून जिंद 145 किमी दूर आहे. त्यामुळे रेल्वेच्या देखरेखीसाठी तांत्रिक सहाय्य पुरवणे आणि प्रायोगिक चाचण्या करणे सोपे झाले. हा नॉन-इलेक्ट्रिफाइड ब्रॉड-गेज मार्ग आहे. ट्रेनच्या आतच एक छोटे पॉवर हाऊस बसवले आहे. यात हायड्रोजन वायूपासून वीज तयार केली जाते आणि त्याच विजेवर ट्रेन चालते. याशिवाय या ट्रेनसाठी ‘ग्रीन हायड्रोजन’ वापरला जाणार आहे, जो सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या नूतनीकरणक्षम स्त्रोतांपासून बनवला जातो. यामुळे संपूर्ण ऊर्जा चक्रच पर्यावरणपूरक बनते.

आणखी एक महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या “हायड्रोजन फॉर हेरिटेज” योजनेअंतर्गत देशातील विविध ऐतिहासिक आणि डोंगराळ मार्गांवर अशाच 35 हायड्रोजन ट्रेन धावणार आहेत. ज्या मार्गांवर विजेच्या तारा टाकणे कठीण आहे, तिथे हा प्रकल्प यशस्वी होईल असे मानले जात आहे. एकूणच मोजक्या 4 देशानंतर भारताने सुरू केलेली ही हायड्रोजन ट्रेन खरंच हरित क्रांती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने सर्वात मोठे पाऊल ठरणार आहे.

hydrogen-train-indias-major-step-towards-the-green-revolution-first-hydrogen-train-runs-on-the-tracks-check-out-its-features

महत्वाच्या बातम्या