सोनम वांगचुक प्रकरणावरून केंद्र सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल, ‘अटक करून आंदोलन थांबणार नाही’

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या घटनेवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या कारवाईला लोकशाहीविरोधी आणि दडपशाहीचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले की, “गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि अखेर तसेच घडले. मात्र, त्यांना अटक करून किंवा उपोषणस्थळावरून हटवून हे आंदोलन थांबणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला लढा पुढेही सुरू राहणार आहे.”

पवार यांनी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी अधोरेखित करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. “देशातील शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर सरकारने अपेक्षित भूमिका घेतली नाही. हजारो विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम झाला असून सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे,” असा आरोप त्यांनी केला.



विरोधी पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा

शरद पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित असल्यामुळे या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, “सत्य, अहिंसा आणि संविधानाच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या एका निःशस्त्र गांधीवादी शास्त्रज्ञाभोवती हजारो पोलिसांचा गराडा घालणे हे सरकारच्या असुरक्षिततेचे लक्षण आहे. सलग २० दिवस उपोषणामुळे अशक्त झालेल्या सोनम वांगचुक यांना संवाद न साधता जबरदस्तीने हटवणे ही लोकशाही नव्हे, तर हुकूमशाही आहे.”

त्यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सरकार केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी दडपशाही करत असून ही घटना अघोषित आणीबाणीची आठवण करून देणारी आहे.

आमदार रोहित पवार यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “आपल्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या एका निस्पृह व्यक्तीला जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातून सरकार आंदोलन मोडून काढण्याचा संदेश देत आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी सरकार निष्क्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही? हा अहंकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.”

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीका करत म्हटले की, “सोनम वांगचुक लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी गेल्या २१ दिवसांपासून उपोषण करत होते. त्यांच्या प्रमुख मागणीवर निर्णय घेण्याऐवजी पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेले. सरकारला त्यांच्या जीवाची खरोखर काळजी असती, तर सुरुवातीलाच संवाद साधून तोडगा काढला असता. मात्र सरकारने जाणीवपूर्वक दडपशाहीचा मार्ग स्वीकारला आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक आहे.”

दरम्यान, सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटविल्यानंतरही आंदोलन सुरू असून, आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. या प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Opposition Slams Centre Over Sonam Wangchuk’s Removal From Protest Site

महत्वाच्या बातम्या