Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

विशेष प्रतिनिधी

पुणे : Dr Kumar Saptarshi  ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, युवक क्रांती दलाचे संस्थापक, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे दुःखद निधन झाले. Dr Kumar Saptarshi

त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील समाजवादी, गांधीवादी आणि पुरोगामी चळवळीतील एक प्रभावी आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. Dr Kumar Saptarshi

डॉ. सप्तर्षी यांनी आयुष्यभर सत्य, अहिंसा, सामाजिक समता, जातिमुक्त समाज आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला. अन्यायाविरोधात अहिंसक आणि सत्याग्रही मार्गाने संघर्ष करण्यासाठी त्यांनी तरुणांना संघटित केले. महाराष्ट्रातील तरुणांना सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी करून घेण्यात त्यांचे मोठे योगदान होते. Dr Kumar Saptarshi



डॉ. सप्तर्षी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९ नोव्हेंबर १९६७ रोजी सिंहगड येथे युवक क्रांती दलाची, युक्रांदची स्थापना केली. जात आणि वर्गमुक्त समाजाची निर्मिती, महिलांचा सन्मान, सर्वधर्मीय बंधुभाव आणि अन्यायाविरोधातील अहिंसक संघर्ष ही संघटनेची प्रमुख तत्त्वे होती.

आणीबाणीनंतर झालेल्या १९७८ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत डॉ. सप्तर्षी जनता पक्षाच्या उमेदवारीवर तत्कालीन अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून विजयी झाले होते. आमदार म्हणून काम करतानाही त्यांनी सामाजिक प्रश्न, सामान्य नागरिकांचे हक्क आणि लोकशाही मूल्यांना प्राधान्य दिले.

ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष होते. पुण्यातील गांधी भवनाच्या माध्यमातून गांधीवादी विचारांचा प्रसार, व्याख्याने, शिबिरे, सामाजिक संवाद आणि विविध लोकशाहीवादी उपक्रमांना त्यांनी सातत्याने पाठबळ दिले. ते ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाचे संपादकही होते.

लेखक म्हणूनही डॉ. सप्तर्षी यांनी सामाजिक, राजकीय आणि वैचारिक विषयांवर विपुल लेखन केले. आंदोलनांचा अनुभव, तुरुंगवास, सामाजिक बदल आणि सार्वजनिक जीवनातील व्यक्तींचे त्यांनी आपल्या लेखनातून परखडपणे विश्लेषण केले. त्यांची लेखनशैली स्पष्ट, निर्भीड आणि विचारप्रवर्तक म्हणून ओळखली जात होती.

त्यांनी गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारांचा प्रभाव स्वीकारत तरुणांना संवैधानिक आणि अहिंसक मार्गाने परिवर्तन घडविण्याचा संदेश दिला. आंदोलन, राजकारण, सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी अनेक दशके सक्रिय योगदान दिले.
सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. २०२५ मध्ये त्यांना बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे गांधीवादी आणि समाजवादी विचारांचे सातत्याने समर्थन करणारा एक बुलंद आवाज शांत झाला आहे. त्यांच्या कार्यातून घडलेल्या अनेक पिढ्यांसाठी त्यांचे विचार, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी ठरणार आहे.

Veteran Socialist Thinker Dr Kumar Saptarshi Passes Away

महत्वाच्या बातम्या