विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील क्रिकेट प्रशासनात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप नेते केदार जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर एमसीएची मतदार यादी गैरप्रकाराने वाढवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. Kedar Jadhav
केदार जाधव यांनी दावा केला आहे की, निवडणुकीच्या अगदी आधी एमसीएच्या आजीव सदस्यांची संख्या सुमारे १५० वरून थेट ६०० हून अधिक करण्यात आली. हा वाढीव समावेश सत्ताधारी गटाच्या फायद्यासाठी करण्यात आला असून, त्यामध्ये रोहित पवार यांचे नातेवाईक, व्यावसायिक भागीदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित पदाधिकारी यांचा समावेश असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये रोहित पवार यांचे तब्बल १८ नातेवाईक, ५६ व्यावसायिक भागीदार आणि ३७ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. याशिवाय रोहित पवार यांच्या पत्नीचाही मतदार यादीत समावेश करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या सगळ्या घडामोडींचा उद्देश रोहित पवार यांना एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फायदा करून देण्याचा असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी केदार जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, सर्वोच्च न्यायालय आणि लोढा समितीच्या सुधारणा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करूनच ही सदस्य नोंदणी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. अशा प्रकारे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर आजीव सदस्य वाढवणे हे लोकशाही प्रक्रिया आणि पारदर्शकतेला बाधा आणणारे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, एमसीएकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, नव्या सदस्यांची नोंदणी ही निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्यात आली असून, सर्व प्रक्रिया नियमांनुसार आणि एमसीएच्या घटनेप्रमाणेच पार पडली आहे.
एमसीए निवडणुका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असून, या निवडणुकांपूर्वीच निर्माण झालेल्या या वादामुळे क्रिकेट प्रशासनातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणात उच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे क्रीडा आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
BJP’s Kedar Jadhav accuses Rohit Pawar of manipulating MCA voter list
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन