अजित पवारांच्या आरोपांना आम्ही उत्तर दिलं, तर त्यांचीच अडचण, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोपांना आम्ही उत्तर दिले, तर त्यांचीच अडचण होईल, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी केला. पवार यांची विधाने ही केवळ निवडणूक पार्श्वभूमीवर केलेली असून आरोप करताना नेमकेपणा असावा, अशी टीकाही त्यांनी केली. Ajit Pawar

भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शनिवारी सकाळी समता भूमी येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून करण्यात आला. त्यानंतर पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते.

चव्हाण म्हणाले, अजित पवार यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. आरोप आणि प्रत्यारोप कसे करावेत, हे त्यांनी ठरवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ते सध्या सत्तेत सहभागी आहेत. त्यांचे नेतृत्व योग्य नाही, असे वाटत असेल, तर त्यांनी ते जाहीरपणे सांगावे. आमच्या नेत्यांवर टीका करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यांच्या आरोपांना आम्ही सविस्तर उत्तर दिले, तर त्यांचीच कोंडी होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, केवळ आरोप करून राजकारण होत नाही. एखाद्या प्रकरणाबाबत शंका असेल, तर संबंधित यंत्रणांकडे रीतसर तक्रार करावी. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला नव्हे, तर विकासकामे करणाऱ्या भाजपला मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.



यंदाची पुणे महापालिका निवडणूक विकसित पुण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, नागरिकांना दर्जेदार सुविधा देणारा पक्ष कोण, याचा हा कस आहे. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे पुण्याच्या विकासाला गती मिळाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी व वेग मिळाला आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा उल्लेख करताना चव्हाण म्हणाले, मेट्रोसाठी महापालिकेत ठराव झाला होता; मात्र महाविकास आघाडीच्या काळात प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. हे प्रकल्प करायचेच नव्हते, असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. वाहतुकीच्या कोंडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले. आता मात्र केंद्र–राज्य सरकार विविध विकासकामांच्या माध्यमातून गतिमान प्रशासन कसे असते, हे दाखवत आहेत.

आगामी काळात पुण्यात पायाभूत सुविधांसाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. एक हजार ई-बस, मेट्रोचा विस्तार, नदी सुधारणा प्रकल्प, रिंगरोड, चोवीस तास पाणीपुरवठा, तसेच सेवा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील विविध प्रकल्प राबवले जात आहेत. राज्यात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक आली असून अनेक कंपन्यांनी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०४७ पर्यंत देश विकसित करण्याच्या ध्येयामध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे ही महापालिका निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नसून, पुण्याच्या आणि देशाच्या भविष्यास आकार देणारी निवडणूक आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

If we respond to Ajit Pawar’s allegations, it will be his problem, warns BJP state president Ravindra Chavan

महत्वाच्या बातम्या