जनतेसाठीचे भूखंड बिल्डरांच्या घशात, नगरविकासचे कर्मदरिद्री काम म्हणत गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : हॉस्पिटल, गार्डन, शाळा आणि रुग्णालयांसाठी मागितलेले भूखंड जनतेला न देता बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम झाले आहे. माझा राग शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा, असा इशाराही देत वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. Ganesh Naik

मी जर नवी मुंबईकरांसाठी चांगले काम करू शकलो नाही, तर मंत्रीपद काय चाटायचं आहे का? असा सवाल करत त्यांनी नगरविकास खात्यावर टीका केली.



नवी मुंबईतील वाशी येथे झालेल्या जनता दरबारात बोलताना ते म्हणाले, नवी मुंबईकरांच्या सुविधा लक्षात घेऊन आम्ही विविध सामाजिक प्रकल्पांसाठी भूखंडांची मागणी केली होती. मात्र हे भूखंड देण्याऐवजी काही दलालांच्या माध्यमातून ते बिल्डरांकडे वळवले गेले. ज्या मंत्रिमंडळात मी स्वतः आहे, त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी असे कर्मदरिद्री काम केले, याची मला लाज वाटते.

नवी मुंबईसाठी मागितलेले भूखंड हे जनतेच्या हितासाठी होते. हॉस्पिटल उभारणी, बागांची निर्मिती, शाळा आणि इतर सार्वजनिक सोयीसुविधांसाठी जागा आवश्यक होती. मात्र ते भूखंड दिले गेले नाहीत. उलट काही दलालांनी हे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मी पक्षाचा आणि प्रशासनाच्या शिस्तीचा आहे, पण जनतेच्या हक्कासाठी बोललो नाही तर मंत्री होण्यात अर्थ काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जनतेच्या हितासाठी असलेली जमीन जनतेलाच मिळाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, तुमची इच्छा असेल तर सिडको आणि एमआयडीसीकडील जे भूखंड जनतेच्या विकासासाठी आहेत, ते जनतेला देण्याची व्यवस्था करा. ते झालं तर माझा राग हळूहळू कमी होईल, असे नाईक म्हणाले.

पक्षाने मला मंत्रीपद दिलं, त्याबद्दल मी आभारी आहे. पण त्याचा अर्थ मी मुका होऊन बसण्यासाठी मंत्री झालो नाही. आमदार आणि मंत्री होण्यामागचा उद्देश हा जनतेसाठी काम करणे हा आहे. जर नवी मुंबईकरांसाठी आवश्यक असलेले भूखंड मिळवू शकलो नाही, तर त्या पदाचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी केला.

Public Plots Going to Builders, Says Ganesh Naik Slamming Shinde

महत्वाच्या बातम्या