विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीत मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या काही वादग्रस्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाने आता या अधिकाऱ्यांना अभय देण्याची भूमिका घेतली आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे तूर्त कोणताही निर्णय न घेण्याचे धोरण आयोगाने स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याच्या तक्रारी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील महापालिका प्रभाग क्रमांक २२५,२२६,२२७ मधील निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करू दिले नाहीत, अशी तक्रार जनता दल आणि आम आदमी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली होती.
अशाच प्रकारे ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मदत केली. आक्षेप घेण्यासाठी त्यांचे अर्ज उपलब्ध करून दिले नाहीत तसेच आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज किरकोळ त्रुटी दाखवून फेटाळण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला होता.
विशेष म्हणजे छाननीच्या वेळी किरकोळ कारणे दाखवून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेल्या काहींनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते याकडेही आयोगाचे लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्याबाबत महापालिका आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी निवडणूक निरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
Relief for Controversial Poll Officials? Election Commission Drags Feet as Case Reaches High Court
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन