वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एअर होस्टेस बनली, पण पिंकीवर अकालीच काळाचा घाला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात प्राण गमावलेल्या पाच जणांमध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी शिवकुमार माळी (वय २९) हिचाही समावेश आहे. पिंकीची स्वप्ने, संघर्ष आणि आशा यांची वेदनादायी कहाणी समोर आली आहे.

वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंकी एअर होस्टेस बनली. तिचे वडील शिवकुमार माळी हे पूर्वी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करत होते. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या विमानाशी संबंधित एका क्षुल्लक घटनेनंतर त्यांना नोकरी गमवावी लागली. त्या प्रसंगाची सल पिंकीच्या मनात खोलवर रुजली होती.

“पप्पा, तुमचं स्वप्न मी पूर्ण करीन,” असे ती नेहमी म्हणायची, असे अश्रू अनावर होत शिवकुमार माळी सांगतात. बारावीनंतर पिंकीने मॉडेलिंग करावे की एअर होस्टेस बनावे, असा प्रश्न विचारला तेव्हा वडिलांनी तिला एअर होस्टेस होण्याचा सल्ला दिला. आणि तिने ते करून दाखवले.

तीन वर्षे तिने इंडियन एअरलाईन्समध्ये काम केले. त्यानंतर खासगी विमान कंपनीत फ्लाईट अटेंडंट म्हणून रुजू झाली. पुढील टप्प्यात आपल्या भावाला पायलट बनवण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले होते. मात्र, नियतीने ते स्वप्न अर्धवटच ठेवले.

पिंकीचे लग्न झालेले असून तिचे पती पुण्यात लार्सन अँड टुब्रो कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबात मोठी बहीण कोकिलाबेन रुग्णालयात परिचारिका आहे. मंगळवारी रात्री पिंकीने वडिलांना फोन करून “उद्या अजितदादांसोबत बारामतीला जाते, त्यानंतर नांदेडला जाईन,” असे सांगितले होते. तोच संवाद तिचा अखेरचा ठरला.

“टीव्हीवर विमान कोसळल्याची बातमी पाहिली आणि पायाखालची वाळूच सरकली,” असे सांगताना माळी कुटुंबाचा आवाज थरथरतो. “माझी मुलगी आता कधीच परत येणार नाही,” हे वाक्य उच्चारताना वडिलांचे दु:ख शब्दांत मावेनासे होते.

पिंकीच्या निधनाने केवळ एक एअर होस्टेस नाही, तर वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारी मुलगी आणि भावाचे भविष्य घडवू पाहणारी बहीण हरपली आहे. तिची कहाणी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.

She Became an Air Hostess to Fulfil Her Father’s Dream, but Fate Cut Pinky Mali’s Journey Short

महत्वाच्या बातम्या