विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रपूरच्या वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून निलंबित करण्यात आलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्यासह सहसंचालक सतीश पडवळ यांच्यावरील निलंबनाची कारवाई लवकरच मागे घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. या अधिकाऱ्यांनी पुराव्यांसह दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. यावर विधानसभा अध्यक्ष आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या अधिकाऱ्यांच्या निलंबनाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी वारंवार बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, एमपीसीबीचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकांना सातत्याने गैरहजर राहिले. मंत्री मुंडे यांच्या स्पष्ट आदेशानंतरही २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग हे ब्रीफिंगसाठी उपस्थित राहिले नाहीत. या प्रकाराची गंभीर दखल घेत, तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. त्यानुसार, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या स्वाक्षरीने सिंग आणि पडवळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले होते.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निलंबनाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पाटील यांनी सभागृहाला माहिती देताना सांगितले की, आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी अनुपस्थित राहण्यामागचे पुरावे सादर केले असून, घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माहितीनंतर विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची नोंद घेत, निलंबन मागे घेण्याच्या संदर्भात कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात स्पष्ट केले की, या संदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आता एम. देवेंद्र सिंग आणि सतीश पडवळ यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
Suspended IAS Officer Devendra Singh Expresses Regret; Suspension May Be Revoked
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा