उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडलीः अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि प्रसिद्ध वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

तेजस यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांच्या सर्व चाचण्या केल्यानंतर तेजस यांना आता बरे वाटू लागल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे रुग्णालयात तेजस यांच्यासोबत असल्याचंही सांगितलं जात आहे.



तेजस ठाकरे बुधवारी सायंकाळी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. बुधवारी रात्री उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर प्रकृतीची माहिती घेतली. यानंतरही उद्धव ठाकरे एकदा-दोनदा रुग्णालयात गेले आणि डॉक्टरांकडे प्रकृतीची विचारपूस केली. सध्या तेजस ठाकरेंच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे. तेजस ठाकरेंना उद्या किंवा परवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. प्रचारात भाग घेतात. मात्र, त्यांनी अधिकृतपणे सक्रिय राजकारणात भाग घेतलेला नाही. तेजस ठाकरे हे वाइल्डलाइफ रिसर्चर आणि फोटोग्राफर आहेत. त्यांचं वाइल्डलाइफ फिल्डमधील काम अत्यंत मोठं आहे. तामिळनाडूत भारतीय रिसर्च टीमने गेकोची एक नवीन प्रजाती शोधली होती.

तेजस ठाकरे यांना ‘TT’ म्हणूनही संबोधलं जातं. तेजस यांनी 2012मध्ये एम्फिबियन आणि रेप्टाइल्सचा शोधात अंबोलीत पहिली हर्पिंग ट्रिप काढली होती. त्यावेळी त्यांचं वय खूप छोटं होतं. या ट्रिपच्यावेळी माश्याची नवीन स्पीशीज सापडली. या प्रजातीचं नाव नंतर शिस्तुरा हिरण्यकेशी ठेवलं गेलं.

2017मध्ये ते अंबोलीला आले होते. त्यांनी या माश्याचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या होत्या. तेजस यांनी 2021मध्ये कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण प्रक्रिया जाहीर केली होती. अंबोलीच्या शिव मंदिरातील तलावात त्याने हा मासा पाहिला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिस्तुरा हिरण्यकेशी बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट टॅग मिळाला होता. आतापर्यंत त्यांनी 60 स्पेशीज शोधल्या आहेत.

Uddhav Thackeray’s Son Tejas Thackeray Hospitalised After Health Scare; Under Treatment at Reliance Hospital

महत्वाच्या बातम्या