आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज, साेनम वांगचुक यांना पाठिंबा देत आदित्य ठाकरे यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकारच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पेपरफुटी असो, इथेनॉलचा प्रश्न असो किंवा मंदिरांचा मुद्दा… भाजपचे एकच धोरण आहे, लोकांमध्ये फूट पाडायची आणि स्वतःची सत्ता टिकवायची, अशी टीका करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते साेनम वांगचुक यांना पाठिंबा दिला आहे.

वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर 28 जूनपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. कॉकरोच जनता पार्टी या संघटनेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात ते सहभागी झाले असून, नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा गुरूवारी 19 वा दिवस आहे.



आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत साइटवरून सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि भाजपवर टीका करणारी एक पोस्ट केली आहे. आदित्य ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “दिल्ली मध्ये सोनम वांगचुक हे ज्या कारणासाठी उपोषण करत आहेत, त्या प्रश्नाविषयी भाजप सरकारची असंवेदनशीलता एकच गोष्ट सिद्ध करते की, या सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही. त्यांची अत्यंत साधी मागणी आहे, पेपरफुटीप्रकरणी अपयशी ठरलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांना जबाबदार धरावे. त्यांना पदावरून हटवावे.

वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारानंतरही इतके अकार्यक्षम केंद्रीय मंत्री कोणत्याही देशात पदावर राहिले नसते. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, ह्या असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकारच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पेपरफुटी असो, इथेनॉलचा प्रश्न असो किंवा मंदिरांचा मुद्दा… भाजपचे एकच धोरण आहे, लोकांमध्ये फूट पाडायची आणि स्वतःची सत्ता टिकवायची.”

दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंचे वडील, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्याशिवाय, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलै नीट पेपरफुटीचा विरोध करण्यासाठी आमरण उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना आणि विद्यार्थ्यांसाठी कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेची स्थापना करणाऱ्या अभिजीत दिपकेंना पाठिंबा देण्याकरिता शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाची घोषणा केली आहे.

We Need to Stand Together: Aditya Thackeray Backs Sonam Wangchuk

महत्वाच्या बातम्या