पुण्यात सहानुभूती विरुद्ध संघटनशक्ती, अजित पवारांचा बालेकिल्ला धोक्यात?

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे जिल्हा हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय गड मानला जात होता. जिल्हा परिषदेवर अनेक वर्षे त्यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्याची छाया थेट जिल्हा परिषद निवडणुकीवर पडलेली दिसत आहे. Ajit Pawar

७३ गटांच्या या निवडणुकीत महायुतीतीलच दोन घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तब्बल ५९ गटांमध्ये हे दोन्ही पक्ष थेट लढतीत आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची भावना, तर दुसरीकडे भाजपची वाढती संघटनशक्ती, असा हा सामना रंगताना दिसतोय.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट , अजित पवार आणि शरद पवार एकत्र निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अजित पवार गटाचे ७१ उमेदवार मैदानात असून, शरद पवार गटाने सात गटांत उमेदवार दिले आहेत. आंबेगाव, मावळ आणि मुळशी या तालुक्यांमध्ये या दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. Ajit Pawar



भाजपने ५९ उमेदवार उभे केले असून, शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर ३६ जागांवर लढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, रासप आणि बसपानेही निवडणुकीत सहभाग घेतला आहे. मात्र राजकीय निरीक्षकांच्या मते खरी लढत ही भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतच रंगणार आहे. Ajit Pawar

भाजपने दुखवट्याचा कालावधी संपताच प्रचारयंत्रणा कार्यान्वित केली. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक पातळीवर घराघरांत जाऊन संपर्क वाढवण्याचे आदेश दिले. कोणताही मोठा नेता प्रचारासाठी येणार नसल्याचे स्पष्ट करत भाजपने बूथस्तरावर काम करण्यावर भर दिला आहे.

दुसरीकडे, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांत नेतृत्त्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो आहे. सहानुभूतीची लाट असली तरी ती मतपेटीत रूपांतरित होणार का, हा मोठा प्रश्न आहे. Ajit Pawar

हवेली, दौंड, शिरूर आणि इंदापूर या तालुक्यांत भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत होत असून या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सात फेब्रुवारीला मतदान होणार असून, नऊ फेब्रुवारीला जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल समोर येणार आहे.

अजित पवारांच्या अनुपस्थितीत पुणे जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात जाणार की सहानुभूतीच्या जोरावर राष्ट्रवादी आपला गड राखणार, याचा फैसला आता अवघ्या काही दिवसांत होणार आहे.

Pune: Sympathy versus organizational strength — Is Ajit Pawar’s stronghold under threat?