विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होत असताना युती-आघाड्यांमधील अंतर्गत विसंवाद ठळकपणे समोर आला आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष परस्परांविरोधात थेट लढणार असले, तरी जागावाटपाचा समन्वय ढासळल्यामुळे काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या मित्रपक्षांमध्येच ४१ प्रभागांपैकी तब्बल १४ प्रभागांत ‘मैत्रीपूर्ण’ लढती रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एबी फॉर्मच्या गोंधळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम मतविभाजनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Thackeray Sena
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आघाडीतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना–मनसे युतीही जाहीर करण्यात आली. शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या काही जागा मनसेला देण्यावरही सहमती झाली होती. मात्र प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर करताना तिन्ही पक्षांनी जादा एबी फॉर्मचे वाटप केल्याने आघाडीत बिघाडीचे संकेत मिळाले होते. त्याचेच परिणाम आता निवडणूक रिंगणात दिसून येत आहेत. परिणामी नऊ प्रभागांत काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांचे उमेदवार एकाच मैदानात उतरल्याने ‘मैत्रीपूर्ण’ लढती अटळ ठरल्या आहेत.
आठ प्रभागांत काँग्रेस, चार प्रभागांत ठाकरे शिवसेना आणि दोन प्रभागांत मनसेचे चारही उमेदवार एकाच चिन्हावर रिंगणात उतरले आहेत. याशिवाय काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना २४ जागांवर एकमेकांविरोधात थेट लढत आहेत. शिवसेना–मनसे यांच्यातही एका प्रभागात एका जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आघाडीतील मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा प्रतिस्पर्धी पक्षांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फुलेनगर–नागपूर चाळ (प्रभाग २) मधील ‘च’ गटात काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना आमनेसामने आले आहेत. खराडी–वाघोली (प्रभाग ४) च्या ‘क’ गटात तसेच कल्याणीनगर–वडगाव शेरी (प्रभाग ५) मधील ‘ब’ गटातही दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. येरवडा–गांधीनगर (प्रभाग ६) येथे चारपैकी तीन गटांत काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेने उमेदवार दिल्याने येथेही मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. कोंढवा खुर्द–कौसरबाग (प्रभाग १९) येथे काँग्रेसने चारही उमेदवार उतरवले असून, त्याच प्रभागात ठाकरे शिवसेना आणि मनसेने प्रत्येकी दोन उमेदवार दिल्याने काँग्रेसला आघाडीतील मित्रपक्षांशीच लढावे लागणार आहे. घोरपडे पेठ–समता भूमी (प्रभाग २६) आणि सहकारनगर–पद्मावती (प्रभाग ३६) येथेही अशीच परिस्थिती आहे.
आघाडी असूनही काही ठिकाणी तिन्ही पक्षांनी एकाच चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. खराडी–वाघोली, येरवडा–गांधीनगर, औंध–बोपोडी, पुणे स्टेशन–जय जवाननगर, हडपसर–सातववाडी, वानवडी–साळुंखे विहार, घोरपडे पेठ–गुरुवार पेठ आणि कासेवाडी–डायस प्लॉट या प्रभागांत काँग्रेससह ठाकरे शिवसेना आणि मनसेचे उमेदवार ‘पंजा’ या चिन्हावर लढत आहेत. कोथरूड–येवलेवाडी, शिवणे–खडकवासला, रामटेकडी–माळवाडी आणि हडपसर–सातववाडी या प्रभागांत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर प्रभाग क्रमांक ३१ आणि ३२ मध्ये मनसेचे उमेदवार ‘इंजिन’ या चिन्हावर मैदानात उतरले आहेत.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून आधीच एबी फॉर्म वाटप झाल्याने अनेक ठिकाणी उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे १६ ठिकाणी ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ ही चिन्हे समोरासमोर ठाकणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस १३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ४३ जागांवर निवडणूक लढवत आहे.
पुणे महापालिकेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून लक्ष्य केले आहे. भाजपने १५८ जागांवर, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सात जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) ११८ जागांवर, काँग्रेस ९१ जागांवर, ठाकरे शिवसेना ७१ जागांवर आणि मनसे ४४ जागांवर निवडणूक लढवत आहे. एकूणच युती-आघाड्यांतील अंतर्गत विसंवाद, मैत्रीपूर्ण लढती आणि थेट संघर्ष यांमुळे पुणे महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची व अनिश्चित ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
Alliance Rift Sparks Friendly Fights: Congress, Thackeray Sena, MNS Face Off in 14 Wards; Clock vs Trumpet in 16 Seats
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन