विशेष प्रतिनिधी
पुणे: Sushma Andhare बारामती विमान अपघातानंतर संपूर्ण राज्यात शोककळा असतानाच, अपघाताच्या कारणांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून या अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. “कमी दृश्यमानतेमुळे अपघात झाला, असे सांगितले जात आहे. मात्र, दूर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान स्पष्टपणे घिरट्या घालताना दिसत आहे. जर तिथे खरोखरच धुके किंवा कमी दृश्यमानता होती, तर इतके स्पष्ट फुटेज कसे मिळाले?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.Sushma Andhare
अंधारे यांनी पुढे म्हटले की, या विषयावर तात्काळ बोलणे संकेताला धरून नसले तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. “ही चौकशी झालीच पाहिजे. इतकेच नव्हे, तर गरज पडल्यास ही चौकशी आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हावी. मात्र, सत्ताधारी पक्षातील एकही नेता याबाबत ठाम भूमिका का घेत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.Sushma Andhare
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांचे मौन का आहे? तसेच राष्ट्रवादीतील इतर ज्येष्ठ नेते यावर उघडपणे का बोलत नाहीत, असा प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडे अधिकृत पत्र पाठवले होते. त्यांच्या मागणीनुसार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) कडून या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, ब्लॅक बॉक्स आणि अन्य तांत्रिक बाबींचा तपास केला जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.
दरम्यान, या साऱ्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अपघातावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अजित पवार यांचा मृत्यू हा अपघाती आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही.”
शरद पवार म्हणाले, “या अपघाताने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. निर्णयक्षमता असलेला, कर्तृत्ववान नेता महाराष्ट्राने गमावला आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. मात्र, कृपा करून या दुःखद घटनेला राजकारणाचे स्वरूप देऊ नये. हा निव्वळ अपघात आहे आणि त्याच्या वेदना संपूर्ण महाराष्ट्राला होत आहेत.”
एकीकडे चौकशीची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे अपघाताच्या कारणांबाबत प्रश्न, शंका आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता AAIB च्या अहवालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, या भीषण दुर्घटनेमागील नेमकी कारणे काय होती, हे स्पष्ट होण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
Clouds of Suspicion Over Baramati Plane Crash; Sushma Andhare Raises Questions
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ