विशेष प्रतिनिधी
पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात मोटेगावकर याने कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केल्याचे उघड झाले असून, या व्यवहारामुळे आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वारजे येथील मोक्याच्या ठिकाणी शिवराज मोटेगावकर याने २०२३ साली तब्बल ५१ गुंठे जागा खरेदी केली आहे. या जमिनीची सध्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे ३० ते ४० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. वारजे परिसरातील वाढत्या विकासकामांमुळे या जागेचे व्यावसायिक महत्त्व मोठे मानले जात आहे.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात सध्या सीबीआयच्या ताब्यात असलेल्या मोटेगावकर यांच्याकडे तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आणि आर्थिक साम्राज्य असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती त्यांनी कशाच्या जोरावर उभी केली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून पेपरफुटीच्या रॅकेटमधून आर्थिक व्यवहार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातूनच वारजेतील ही कोट्यवधींची जमीन खरेदी करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या व्यवहारातील पैशांचा स्त्रोत काय होता, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सीबीआयकडून मोटेगावकर यांच्या आर्थिक व्यवहारांची, मालमत्तांची तसेच संबंधित जमीन खरेदीची सखोल चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असताना, आता आरोपींकडे उघड होत असलेली कोट्यवधींची मालमत्ता पाहता या रॅकेटची व्याप्ती किती मोठी होती, याची चर्चा सुरू झाली आहे.
NEET paper leak case: Shivraj Motegaonkar’s multi-crore land purchase in Warje comes to light
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश