विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहराला नवा महापौर कधी मिळणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. त्याबाबतचा अधिकृत कार्यक्रम विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्त यांच्यातील चर्चेनंतर निश्चित होणार आहे. महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने शुक्रवार (दि२३) रोजी विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांनी दिली. PMC Commissioners
प्रशासक राज लागू होण्यापूर्वी पुणे महापालिकेचे नवनिर्वाचित सभागृह साधारणपणे दरवर्षी १५ मार्च रोजी अस्तित्वात येत असे. त्या पार्श्वभूमीवर महापौर निवडीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी किमान पंधरा दिवस आधी विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्याची परंपरा होती. मात्र, गेल्या चार वर्षांच्या प्रशासक राजामुळे ही प्रक्रिया खंडित झाली होती. त्यामुळे यावेळी महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम ठरविताना विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्त यांच्यात सविस्तर विचारविनिमय करूनच अंतिम तारीख जाहीर केली जाणार असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्तेत पुनरागमन केले आहे. या निवडणुकीत महिला नगरसेवकांची संख्या लक्षणीय असून, एकूण ८९ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यापैकी ६७ महिला नगरसेविका भाजपच्या आहेत. भाजपच्या एकतर्फी विजयानंतर महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून, यावेळी हे पद महिला वर्गासाठी राखीव राहिले आहे. त्यामुळे आता महापौर निवडीच्या प्रक्रियेला औपचारिक सुरुवात होणार आहे.
नियमांनुसार, सर्वप्रथम पुणे महापालिकेकडून विभागीय आयुक्तांना महापौर निवडणूक कार्यक्रमासंदर्भात पत्र पाठविले जाते. त्यानंतर विभागीय आयुक्त या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती करतात. मुख्य सभा घेण्यासाठी सात दिवसांचा नोटीस कालावधी दिला जातो. सभेच्या नोटिसीनंतर महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून नामांकन अर्ज मागविले जातात. निवडणुकीच्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारांना नामांकन मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला जातो. त्यानंतर तात्काळ मतदान प्रक्रिया पार पडते आणि पीठासीन अधिकारी विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा करतात.
या पार्श्वभूमीवर महापौर-उपमहापौर निवडीच्या कार्यक्रमासंबंधी एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रानुसार २३ जानेवारी रोजी महापालिकेच्या नगरसचिवांकडून नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलाविण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार असल्याचे नमूद आहे. त्यानंतर २४ व २५ जानेवारी रोजी मुख्य सभेची तारीख, वेळ तसेच पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. २७ व २८ जानेवारी रोजी नामांकन दाखल होतील, तर ३० व ३१ जानेवारी रोजी विशेष सभा घेऊन मतदानाद्वारे महापौर व उपमहापौरांची निवड होईल, असा उल्लेख या पत्रात आहे. मात्र, या कार्यक्रमास अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसल्याचे नगरसचिव योगिता भोसले यांनी स्पष्ट केले आहे. पुणेकरांचे लक्ष आता अधिकृत घोषणेकडे लागले असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शहराला नवा महापौर मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
New Mayor Likely in First Week of February; Divisional and PMC Commissioners to Finalise Date
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : काेल्हापुरातही शिंदेसेनेचा महापाैरपदावर डाेळा, काॅंग्रेससाेबत एकत्र येण्याची तयारी?
- डाॅ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी
- Shiv Sena : शिवसेना काेणाची, धनुष्यबाण काेणाच्या हातात: बुधवारपासून सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- महापौर पदाच्या आरक्षणाची साेडत 22 जानेवारीला