विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महारपालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत देत पुणेकरांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून, हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शहराच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार भाजप नगरसेवक गटाने केला आहे. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित ११९ नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली.
भाजप नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी विधानभवन येथे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी नवनिर्वाचित नगरसेवकांची नोंदणी तसेच आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. या कार्यक्रमास भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
माध्यमांशी संवाद साधताना गणेश बिडकर यांनी सांगितले की, पुणेकरांनी भाजपावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. सलग तिसऱ्यांदा गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा हा विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला जाईल. पुणे शहर अधिक गतिमान, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्व नगरसेवक एकत्रितपणे काम करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधांचा दर्जा उंचावणे या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाईल, असे बिडकर यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्प, नदी सुधार योजना यांसारखे दीर्घकालीन आणि मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारे प्रकल्प मार्गी लावतानाच, सामान्य पुणेकरांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यावर विशेष भर राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिकेतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखत पारदर्शक आणि परिणामकारक कारभार देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहराचा संतुलित विकास साधताना सर्व भागांना समान न्याय मिळावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने निर्णय घेतले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुण्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल गटनेते बिडकर यांनी शोक व्यक्त केला. महापालिकेतील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना अजित पवार यांचे विकासासाठी नेहमीच सकारात्मक सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यांचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता लोकप्रतिनिधींवर आहे, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व नगरसेवक एकजुटीने काम करून अजित पवार यांच्या स्वप्नातील विकसित, आधुनिक आणि सक्षम पुणे शहर साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असे बिडकर यांनी सांगितले. पुणेकरांनी दिलेल्या जनादेशाचा आदर राखत, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कारभार देण्याचा निर्धार भाजप नगरसेवक गटाने या निमित्ताने व्यक्त केला आहे.
Pune BJP Councillors’ Group Formally Registered Under Ganesh Bidkar’s Leadership, Vow to Accelerate Development
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ