विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकांनंतर आणि महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहराच्या पुढील महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदा पुणे महापौरपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव ठरल्याने पुण्याला दहावी महिला महापौर मिळणार हे निश्चित झाले आहे. भाजपच्या अनेक महिला नगरसेविका या पदासाठी इच्छुक असल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिकेच्या इतिहासात महिलांना महापौरपदाची संधी मिळण्याचा हा दहावा प्रसंग ठरणार आहे. यापूर्वी नऊ महिलांनी महापौरपदाची धुरा सांभाळली आहे. सन १९९२ मध्ये कमल व्यवहारे यांनी पुण्याच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळवला होता. काँग्रेस पक्षाकडून त्या महापौरपदी निवडून आल्या होत्या. त्यानंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चव्हाण, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, दिवंगत चंचला कोंद्रे आणि मुक्ता टिळक यांनी महापौर म्हणून काम केले आहे.
पुणे महापालिकेतील सत्तासमीकरण भाजपच्या बाजूने झुकलेले असून, त्यामुळे महापौरपदावर भाजपचीच उमेदवार विराजमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपमधील अनेक अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामुळे दहावी महिला महापौर अनुभवी असेल की नव्या पिढीतील असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही नावे महापौरपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत. या सर्व नगरसेविका महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव, संघटनात्मक बांधिलकी आणि स्थानिक पातळीवरील सक्रियतेसाठी ओळखल्या जातात. त्यांच्यामध्ये कोणाला संधी मिळणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी अंतर्गत पातळीवर जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे समजते.
याशिवाय दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचे नावही चर्चेत आहे. बापट कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी आणि पुण्याच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता, स्वरदा बापट यांना महापौरपदासाठी संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. भाजपकडून युवा आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून त्यांचे नाव पुढे येत असल्याचे पक्षातील जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, महापौरपदाची निवड केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नसून, पुढील अडीच वर्षांत शहराच्या विकासाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण अशा अनेक प्रश्नांवर नव्या महापौरांना निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे पुण्याच्या दहाव्या महिला महापौरपदाची निवड ही राजकीयदृष्ट्या तसेच प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.
आगामी काही दिवसांत महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम पार पडणार असून, त्यानंतर पुण्याला नवी महिला महापौर मिळणार आहे. त्या कोण असतील, याची उत्कंठा पुणेकरांमध्ये वाढत चालली आहे.
Pune Set to Get Its 10th Woman Mayor
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : काेल्हापुरातही शिंदेसेनेचा महापाैरपदावर डाेळा, काॅंग्रेससाेबत एकत्र येण्याची तयारी?
- डाॅ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी
- Shiv Sena : शिवसेना काेणाची, धनुष्यबाण काेणाच्या हातात: बुधवारपासून सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- महापौर पदाच्या आरक्षणाची साेडत 22 जानेवारीला