विशेष प्रतिनिधी
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार आणि पेपर काढणाऱ्या प्राध्यापकांची बौद्धिक दिवाळखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’ (डीटीएल) अभ्यासक्रमाचा चक्क १०० गुणांचा संपूर्ण पेपर एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसाच्या तसा ‘कॉपी-पेस्ट’ केल्याचा धक्कादायक प्रताप समोर आला असून, यामुळे शिक्षण वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. Pune University
विद्यापीठाकडून १५ मे रोजी ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’ या पदविका अभ्यासक्रमाची ‘बुक किपिंग अँड अकाउंटन्सी’ या विषयाची परीक्षा घेण्यात आली. २०२५ च्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार १०० गुणांसाठी पहिल्यांदाच हा पेपर घेतला गेला होता. त्यामुळे विद्यार्थी या परीक्षेसाठी गांभीर्याने तयारी करत होते.
मात्र, विद्यापीठाने तयार केलेली प्रश्नपत्रिका एका खासगी प्रकाशकाच्या ‘लॉयर्स कंपॅनियन ऑन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी फॉर डीटीएल’ या पुस्तकातून हुबेहूब उचलण्यात आली. प्रश्नपत्रिकेत विचारलेले सर्वच्या सर्व आठही प्रश्न याच एका पुस्तकातून जसेच्या तसे घेण्यात आले आहेत.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, हेच आठ प्रश्न २०२३ मध्ये ‘डीईएस श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात’ झालेल्या याच विषयाच्या अंतर्गत परीक्षेतही विचारले गेले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या पेपर सेटर्सनी नवीन प्रश्न तयार करण्याचे कष्ट न घेता, केवळ एका जुन्या प्रश्नपत्रिकेची आणि खाजगी पुस्तकाची पाने उलटून आपले काम भागवल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की
“विद्यापीठाच्या मुख्य परीक्षेत जर एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून १०० टक्के पेपर छापून येणार असेल, तर आम्ही वर्षभर इतर संदर्भग्रंथ आणि अभ्यासक्रम का वाचायचा? हा प्रकार म्हणजे आमच्या वर्षभराच्या अभ्यासाची आणि गुणवत्तेची क्रूर थट्टा आहे.”
या संपूर्ण प्रकरणावर प्राध्यापक वर्गातूनही तीव्र निषेध नोंदवला जात आहे. प्रा. सुभाष शहाणे यांनी या प्रकरणावर बोलताना म्हणाले क एका विशिष्ट प्रकाशनाच्या पुस्तकातून आणि जुन्या प्रश्नपत्रिकेतून १०० टक्के पेपर कॉपी करणे, हे पेपर सेटर्सच्या बौद्धिक आळशीपणाचे आणि टोकाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन कसे होणार? कुलगुरूंनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित दोषी प्राध्यापकांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे.
या गंभीर गोळाफेकीनंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सावध भूमिका घेतली आहे. या प्रकरणी चौकशीचे आश्वासन देण्यात आले आहे.
“डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (डीटीएल) अभ्यासक्रमाची शुक्रवारी झालेल्या ‘बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी’ विषयाची प्रश्नपत्रिका आणि संबंधित प्रकाशन संस्थेच्या पुस्तकातील प्रश्नांची पूर्ण शहानिशा केली जाईल. तपासणीअंती नियमानुसार योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. असे विद्यापीठाचे संचालक डॉ. आर. एस. तलवारी यांनी सांगितले.
आता विद्यापीठ प्रशासन या प्रकरणी केवळ नावापुरती चौकशी करते की दोषी प्राध्यापकांवर आणि पेपर सेटर्सवर खरोखरच कठोर कारवाई करून परीक्षेची विश्वासार्हता जपते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pune University Mess: 100-Mark ‘DTL’ Exam Paper Copy-Pasted Directly from Private Publication!
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा