Ajit Pawar : तिकीट नाकारल्याने भाजपमध्ये असंतोष; अनेक माजी नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, त्याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला होताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस उरले असतानाच सहा माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.Ajit Pawar

भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता गलांडे, माजी नगरसेवक शंकर पवार, धनंजय जाधव आणि संदीप जर्‍हाड यांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवार गटाची वाट धरली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ॲड. निलेश निकम, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जयराज लांडगे यांनीही राष्ट्रवादी (अजित पवार गट)मध्ये प्रवेश केला.
भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना थेट फोन करून आणि एबी फॉर्म देत प्रक्रिया राबविल्याने तिकीट न मिळालेल्यांचा रोष वाढला. या असंतोषातूनच अनेक माजी नगरसेवकांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.Ajit Pawar



\दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने त्यांच्या ताकदीत भर पडली असून, या नव्या प्रवेशांमुळे अजित पवार गट अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारणात आणखी हालचाली वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Ajit Pawar

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी आहे. मात्र, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या तुलनेने अधिक असल्याने बंडखोरीची भीतीही तेवढीच वाढलेली आहे. सुरुवातीला भाजपकडून शुक्रवारी (दि. २६) १०० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, असे संकेत देण्यात आले होते. मात्र, त्या दिवशी यादी जाहीर झाली नाही. त्यानंतर रविवारी (दि. २८) यादी जाहीर करण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे पुणे महापालिका निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ यांनी जाहीरपणे सांगितले होते. तरीही अपेक्षेप्रमाणे यादी जाहीर न झाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे चित्र होते.

मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेत भाजपने उमेदवारांची नावे जाहीर न करता थेट संबंधितांना अर्ज भरण्याचा संदेश पाठवण्याचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितल्याचे आज स्पष्ट झाले. त्यानुसार सोमवारी (दि. २९) सुमारे ८० उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक ठिकाणी भाजपचे इच्छुक उमेदवार एकाच वेळी अर्ज भरण्यासाठी पोहोचल्याने राजकीय हालचालींना अधिकच वेग आला.

मंगळवार (दि. ३०) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी तीन वाजल्यानंतरच ए आणि बी फॉर्म देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. यामागे आणखी एक महत्त्वाचा राजकीय हिशोब असल्याचे बोलले जात आहे. ज्यांना तिकीट नाकारण्यात येणार आहे, असे प्रभावी आणि ‘तगडे’ उमेदवार तात्काळ अन्य पक्षांकडून उमेदवारी मिळवू शकतात. ती संधी मिळू नये, यासाठीच ऐनवेळी बी फॉर्म देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

विशेष म्हणजे, भाजपने राज्यातील कोणत्याही महापालिकेसाठी अधिकृत उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. मुंबई, पुण्यासह सर्वच महापालिकांमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी हीच क्लुप्ती वापरली जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. काही उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले असले, तरी त्यांना अद्याप एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीत. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी फॉर्म देण्यात येईल, असे त्यांना कळवण्यात आल्याचे समजते.

या सगळ्या घडामोडींमुळे भाजपचे अधिकृत उमेदवार नेमके कोण असतील, हे मंगळवारी दुपारी तीन वाजल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत पुण्याच्या राजकारणात अनिश्चितता आणि उत्सुकता कायम राहणार आहे.

Ticket Denials Trigger BJP Unrest; Several Former Corporators Join Ajit Pawar Camp

महत्वाच्या बातम्या