विशेष प्रतिनिधी
पुणे : Vyankoji Khopade पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ ई (बालाजीनगर-आंबेगाव कात्रज) मधून निवडून आलेले भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात अनधिकृत बांधकामांबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक, पुणे महापालिका निवडणूक समन्वयक व माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. खोपडे यांची निवड रद्द करून त्यांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी पुणे न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली असल्याचे मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी अॅड. सुरेश पलांडे आणि अॅड. धैर्यशील पलांडे उपस्थित होते.Vyankoji Khopade
मोरे यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान व्यंकोजी खोपडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात “अनधिकृत बांधकाम नाही” असा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात सर्व्हे नंबर ८, गुजर निंबाळकरवाडी येथे हिल टॉप-हिल स्लोप, १८ मीटर डीपी रस्ता आणि शेती न-विकास क्षेत्र (नॉन-डेव्हलपमेंट झोन) असल्याचे गॅझेट प्रसिद्ध झाले आहे. असे असतानाही या सर्व्हे नंबरवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.Vyankoji Khopade
खोपडे डेव्हलपर्स या फर्मच्या माध्यमातून ‘गोरक्ष स्मृती व्हिला’ या नावाने उभारलेल्या इमारतींमध्ये १४१ अनधिकृत फ्लॅट बांधण्यात आले असून त्यांची दस्त नोंदणीही झाल्याचे मोरे यांनी सांगितले. तसेच त्यांचे वडील मारुती खोपडे यांच्या नावाने सुमारे ४० फ्लॅट असल्याचा दावा करत एकूण १८१ अनधिकृत फ्लॅटचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या फर्ममध्ये व्यंकोजी खोपडे यांच्यासह जगन्नाथ केरबा खोपडे, कानिफनाथ जगन्नाथ खोपडे व रामदास काशिनाथ खोपडे यांचा समावेश असून प्रत्येक करारनाम्यावर चौघांच्यावतीने व्यंकोजी खोपडे यांच्या सह्या असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
पीएमआरडीएकडून कोणतीही विकास परवानगी दिलेली नसतानाही ही बांधकामे करण्यात आली, अशी माहिती पीएमआरडीएकडून मिळाल्याचा दावा मोरे यांनी केला. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना बेकायदा पद्धतीने परवानग्या देण्यात आल्या, तसेच महापालिकेत समाविष्ट होण्याच्या आधी बॅकडेटेड नोंदी करून बांधकामांना परवानगी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. पुढे महापालिकेत गावे आल्यानंतर प्रभाग क्रमांक ३ मधून ४३३५ फ्लॅटची नोंद महापालिकेत करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
दरम्यान, अनधिकृत उत्खनन प्रकरणी १ लाख २५ हजार रुपयांचा सरकारी दंड आजही खोपडे यांच्या नावावर दाखवत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ग्रामपंचायत काळात बोगस नोकरभरतीत नातेवाईकांची वर्णी लावण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू असल्याचेही मोरे यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्याची सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तसेच निवडणुकीसंदर्भातील घडलेल्या घटनांची माहिती असलेला पेन ड्राईव्ह न्यायालयात सादर करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.
याप्रकरणी अॅड. सुरेश पलांडे यांनी सांगितले की, निषिद्ध क्षेत्रात झालेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांमध्ये थेट सहभाग असूनही प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख न करणे हा कायद्याचा भंग आहे. अॅड. धैर्यशील पलांडे यांनी, बेकायदा बांधकामात सहभागी असलेल्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार नसल्याचे नमूद केले.
सरपंच काळात भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी अनधिकृत बांधकामे केली. दस्तावर स्वतः खोपडे यांची सही आहे. निवडणुकीत खोपडे यांचा अर्ज बाद करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकार्यांना भेटलो. त्यांनी अर्ज बाद करण्याचे अधिकार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे नगरसेवक पद रद्द होऊन पुन्हा नव्याने निवडणूक व्हावी. त्यामुळे पुन्हा निवडणूक होऊन चांगल्या माणसानं काम करण्याची संधी मिळावी. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल, असे वसंत मोरे म्हणाले.
वसंत मोरे यांनी केलेल्या आरोपांवर सध्या मला काहीच बोलायचे नाही. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर माझे म्हणणे न्यायालयातच मांडणार असल्याचे
व्यंकोजी खोपडे यांनी सांगितले.
मोरे यांनी केलेले प्रमुख आरोप
– निवडणूक प्रतिज्ञापत्रात अनधिकृत बांधकाम नसल्याचा खोटा दावा
– सर्व्हे नं. ८, गुजर निंबाळकरवाडी येथे निषिद्ध क्षेत्रात बांधकाम
-‘गोरक्ष स्मृती व्हिला’मध्ये १४१ अनधिकृत फ्लॅटचा आरोप
– वडील मारुती खोपडे यांच्या नावाने सुमारे ४० फ्लॅट; एकूण १८१ फ्लॅटचा दावा
– पीएमआरडीएकडून विकास परवानगी नसतानाही बांधकाम
– ग्रामपंचायत काळात बेकायदा परवानग्या व बॅकडेटेड नोंदीचा आरोप
– अनधिकृत उत्खनन प्रकरणी १.२५ लाखांचा दंड प्रलंबित असल्याचा दावा
– बोगस नोकरभरती प्रकरणी चौकशी सुरू असल्याचा आरोप
– निवडणूक नामनिर्देशन पत्रात राहत्या घराचा पत्ता विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळ गुजर निंबाळकर दिला असून टॉयलेट ना हरकत प्रमाणपत्र याच घराची घेतली आहे.
त्या घराचा १ लाख ७४ हजार १८७ रुपये कर थकला आहे.
– अनेक मिळकती लपवल्या.
– गोरक्ष व्हीला सर्व्हे नंबर ८ येथील दुकान लपवले.
मोरे यांची मागणी?
– व्यंकोजी खोपडे यांची निवड रद्द करावी
– नगरसेवक पदावरून अपात्र ठरवावे
– प्रभाग ३८ ई मध्ये नव्याने निवडणूक घ्यावी
Vasant More Files Election Petition Against BJP Corporator Vyankoji Khopade
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,