विशेष प्रतिनिधी
पुणे : शहर आणि परिसरातील वाढत्या प्रदूषणाने आता धोक्याची पातळी ओलांडली असून, यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अत्यंत कडक पवित्रा घेतला आहे. नदी प्रदूषण, कचरा व्यवस्थापन आणि हवेची खालावलेली गुणवत्ता या प्रश्नांवर पुणे महानगरपालिकेला धारेवर धरत, मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी थेट फौजदारी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आगामी काळात महापालिका प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दी आणि तलावांच्या दुरवस्थेवरून महापालिकेला ‘अल्टिमेटम’
पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सिद्धेश कदम यांनी स्पष्ट केले की, नद्या स्वच्छ ठेवणे ही महापालिकेची प्राथमिक घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, वास्तवात मैलापाणी प्रक्रिया न करताच नद्यांत सोडले जात असल्याने नदीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
कदम यांनी ठणकावून सांगितले की, शहराचे प्रदुषण रोखण्यात पालिका अयशस्वी ठरली तर आम्हाला पालिकेवर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे. आम्ही तीन वेळा स्पष्ट निर्देश देतो. यानंतरही जर सुधारणा झाली नाही, तर केवळ नोटीस न देता थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.” केवळ नद्याच नव्हे, तर पाषाण तलावाच्या प्रदूषणाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. पाषाण तलाव आणि धायरी, वडगाव नऱ्हे परिसरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यात महापालिका अपयशी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, या प्रकरणांमध्ये कोणताही राजकीय दबाव खपवून घेतला जाणार नाही आणि सर्व जबाबदारी महापालिकेची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, पुणे शहरात सुरू असलेल्या प्रचंड बांधकामामुळे हवेतील धुळीचे कण वाढले असून हवेची गुणवत्ता (AQI) खालावली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मंडळाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. रेडी मिक्स कॉंक्रिट (RMC) प्लँट्सना आता शेड उभारणे, डस्ट फिल्टर लावणे आणि फॉगिंग सिस्टम बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या प्लँट्सकडून या नियमांचे उल्लंघन होईल, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ सील ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कचरा हा केवळ प्रश्न नसून तो एक उद्योग होऊ शकतो, या विचारातून एमपीसीबी आता ‘रिसायकलिंग शो’ ही मोहीम राबवत आहे. ही मोहिम राज्यातील चार ठिकाणी राबवण्यात येणार आहे. पुण्यात दरवर्षी सुमारे २४,००० मेट्रिक टन ई-कचरा निर्माण होतो. या कचऱ्यातून मौल्यवान धातू आणि इतर साहित्य वेगळे करून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, ऑटोमोबाईल क्षेत्रातील जुने टायर आणि सुट्या भागांच्या पुनर्वापरासाठी विशेष प्रकल्प राबवून कचरा डेपोवरील ताण कमी करण्याचा मंडळाचा मानस आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांवरही कारवाईची टांगती तलवार
केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे, तर नागरिकांच्या जबाबदारीवरही मंडळाने बोट ठेवले आहे. ज्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) बसवलेले नाहीत किंवा जे प्रकल्प केवळ शोभेच्या वस्तू म्हणून बंद अवस्थेत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्या आता एमपीसीबीच्या रडारवर असतील.
तसेच एमपीसीबीचे कार्यालय बारामतीला हलवले जाणार असल्याच्या अफवांचे खंडन करताना कदम म्हणाले की, पुण्याचे प्रादेशिक कार्यालय पुण्यातच राहील. कामाचा वाढता व्याप पाहता चाकण आणि बारामती येथे ‘उप-प्रादेशिक कार्यालये’ सुरू केली आहेत, जेणेकरून स्थानिक उद्योजकांना पुण्याला येण्याची गरज पडणार नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे कार्यालय हलवले जाणार असल्याच्या चर्चांना देखील कदम यांनी पूर्णविराम दिला. “पुणे कार्यालय पुण्यातच राहणार. उलट काम वाढल्यामुळे चाकण आणि बारामती येथे उपकार्यालये सुरू केली आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्योगपतींना सोयीस्कर सेवा मिळणार असली तरी नियमभंग करणाऱ्यांना मात्र सवलत मिळणार नाही.प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ‘हायटेक’ यंत्रणाही सज्ज झाली आहे. शहरात १५ नवीन निरीक्षण केंद्रे उभारली जाणार असून, उद्योगांमधून होणारे प्रदूषण थेट ऑनलाइन ट्रॅक केले जाणार आहे. त्यामुळे ‘चोरीछुपे’ प्रदूषण करणाऱ्यांची आता खैर नाही.
दरम्यान, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आतापर्यंत कारवाई मर्यादित होती. मात्र, ५३० नवीन पदांच्या भरतीला मंजुरी मिळाल्याने मंडळाला नवी ताकद मिळणार आहे. पुढील काही महिन्यांत यंत्रणा अधिक आक्रमक आणि सक्षम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Criminal case warning against Pune civic body over pollution failure
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल