Manjusha Nagpure, Shrikant Jagtap : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाची जोरदार सुरुवात, मंजुषा नागपुरे, श्रीकांत जगताप बिनविरोध

विशेष प्रतिनिधी

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्ष (भाजप) ने आपले खाते उघडत राजकीय आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी–माणिकबाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपूरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या सलग तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या आणि यावेळी कोणतीही लढत न होता त्यांचा विजय निश्चित झाला.



निवडणूक जाहीर होण्याच्या टप्प्यातच मिळालेल्या या विजयामुळे भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मंजुषा नागपूरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने पहिल्याच टप्प्यात राजकीय ताकद दाखवून दिल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, भाजपाचा आणखी एक उमेदवारही बिनविरोध विजयी ठरला आहे. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक ३५-ड (सर्वसाधारण गट) येथून श्रीकांत शशिकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक अर्ज दाखल केलेल्या नितीन गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे जगताप यांचा विजय सुनिश्चित झाला.

एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असतानाच, भाजपाने दोन बिनविरोध विजय मिळवत विरोधकांना सुरुवातीलाच धक्का दिला आहे. आगामी काळात पुण्यातील इतर प्रभागांमध्ये राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP makes a strong start in Pune Municipal Corporation elections, Manjusha Nagpure, Shrikant Jagtap unopposed

महत्वाच्या बातम्या